ब्रह्मांड संगीत कट्टयावर रंगली संगीतो पयोगी कार्यशाळा!

ठाणे , प्रतिनिधी  : समाजसेवेत तथा मनोरंजनक्षेत्रात अग्रेसर असलेल्या सुप्रसिद्ध ब्रह्मांड कट्टयाने संगीत शिक्षणाच्या दृष्टिने पाऊल उचलले असून ऑनलाईन माध्यमाद्वारे दर महिन्यात संगीतशिक्षणाच्या दृष्टीने विविध विषय घेऊन मोफत संगीत कार्यशाळा आयोजित केली जाते.               याआधी आयोजित केलेल्या संगीत कार्यशाळा १,२,३ व ४ च्या उदंड प्रतिसादानंतर जुलै महिन्यातील संगीत कार्यशाळा २४ जुलै रोजी पार पडली. या कार्यशाळेत सुप्रसिद्ध गायक, संगीतकार व सा रे ग म प विजेते श्री. अवधूत रेगे यांनी मार्गदर्शन केले.        ऋजुता देशपांडे यांनी तांत्रिक तसेच सूत्रसंचालनाची दूहेरी बाजू सांभाळत अत्यंत साचेबद्ध पद्धतीने कार्यशाळेचा डोलारा सांभाळला. ऋजुता यांनी ईश्वराची आळवणी करुन कार्यशाळेचा श्रीगणेशा केला व प्रभावी निवेदनाने कार्यशाळेतील सुसुत्रता अबाधित ठेवली.               प्रथम ऋजुता यांनी मुलाखतीद्वारे अवधूत यांचा संगीतप्रवास उलगडला. सर्व रसिक जे ऐकण्यास उत्सुक होते  त्या 'सा रे ग म प' तसेच 'मेरी आवाज सुनो' या स्पर्धात्मक कार्यक्रमादरम्यानचे अनेक प्रेरणादायक किस्से अवधूत यांनी सांगितले. अवधूत यांनी अनेक दिग्गज व ज्येष्ठ गायकांबरोबर गाणी गायली आहेत. त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायनही केले आहे. तसेच अनेक भक्तीगीतांच्या अल्बम्ससाठी व जिंगल्ससाठी त्यांनी संगीतकार म्हणुन काम केले आहे.              अवधूत यांच्या 'शमंग एंटरटेनमेंट' या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतर्फे सेलिब्रिटींचे अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम होत असतात. अवधूत यांनी कार्यशाळेत सर्वप्रथम आवाजाची काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली. आवाजाला बळकटपणा व लवचिकता येण्यासाठी करावयाच्या सरावांची त्यांनी प्रत्यक्षिके दाखविली.               आजच्या स्पर्धेच्या काळातील अष्टपैलु गायकीचे महत्व त्यांनी विशद केले व त्यासाठी लागणारी मेहनत व सराव यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. विविध गीतांची उदाहरणे घेऊन अवधूत यांनी मिंड, हरकती, आवाजातील उतारचढाव, भाव अशा गायनातील अनेक बारकाव्यांविषयी मार्गदर्शन केले. अवधूत यांनी ज्येष्ठ गायकांबरोबरचे अनुभव कथन करत सदस्यांना प्रोत्साहित केले.                या कार्यशाळेस संगीतप्रेमींचा उत्तम प्रतिसाद लाभला. प्रश्नोत्तरांच्या सत्रात रसिकांनी सक्रिय सहभाग दर्शवून तज्ञांकडून प्रश्नांचे शंकानिरसन करुन घेतले. ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक श्री. राजेश जाधव यांनी अवधूत यांचे आभार मानले. 
                रसिकांचा सहभाग व आवड पहाता तसेच ज्ञानार्जनातील प्रगत पाऊल म्हणून ब्रह्मांड कट्टा पुढील कार्यशाळा लवकरच रसिकांच्या भेटीस घेऊन येणार आहे असे आवाहनही त्यांनी केले. या मोफत कार्यशाळा म्हणजे उत्तम गायक घडविण्यात कलासक्त ब्रह्मांड कट्टयाने उचललेला मोलाचा वाटा आहे यात वादच नाही.

Post a Comment

0 Comments