ब्रह्मांड संगीत कट्टयावर रंगला सुरांचा कौटुंबिक सोहळा "सुरों की महफ़िल"

ठाणे , प्रतिनिधी  : करोनामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून बाहेर पडण्याचं मोठं शस्त्र म्हणजे संगीत. ब्रह्मांड कट्टा अंतर्गत ब्रह्मांड संगीत कट्टयाच्या शिलेदारांनी रविवार दि. २५ जुलै रोजी आॕनलाईन कार्यक्रम "सुरों की महफिल" हा सदाबहार गाण्यांनी नटलेला सुरीला कार्यक्रम सादर करुन सुरांच्या महापूरात रसिकांना बुडवून टाकले.


            ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी या कार्यक्रमाचे औचित्य साधत सालाबाद प्रमाणे ब्रह्मांड विभागातील दहावी शालांत परिक्षत उत्तीर्ण झालेले कु. करन सतीश सामंत या विद्यार्थ्यांचा 97% मार्क मिळाल्याबद्दल प्राथमिक स्वरुपात जाहीर सत्कार केला आणि अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.              तसेच कलाकारांनाही अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. कालच्या कार्यक्रमाची सेलीब्रिटी होती ब्रह्मांड संगीत कट्ट्याची लीटल चॕम्प "आकांक्षा". कार्यक्रम सर्वांग सुंदर असाच झाला कारण रसिक श्रोत्यांच्या आवडीची निवडलेली सदाबहार गाणी, सुर, ताल, गाण्याचे उत्तम ट्रॕक, सर्वोत्तम सादरीकरण, आणि रसिकांना जखडून ठेवणारं माहीतीपूर्ण निवेदन, उत्तम तांत्रिक बाजु ह्या सगळ्या बाबींमुळे कार्यक्रम उठावदार, प्रभावी झाला.            कार्यक्रमाची सुरुवातच आकांक्षा वा अॕड, सौ. उमा धापते ह्यांच्या गोड आवाजातील गणेश स्तवन गजानना श्री गणराया ह्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर एका पेक्षा एक अशा अवीट सुरांची रीमझीम बरसातच झाली. तरुणाईचं सळसळतं चैतन्य दर्शवणारं जो जीता वोही सिकंदर मधलं आमिर खानच्या उदीत नारायण यांच्या स्वरातील "पहला नशा पहला खुमार" हे उत्स्फुर्त गाणं मंगेश भोईरने सादर करुन रसिकांना नशेत बुडवून टाकलं.            ह्या नशेतून सावरत असतांनाच मंगेश भोईर ह्यांनीच मदन मोहन महम्मद रफी काॕम्बिनेशनचं हँसते जख्म मधलं "तुम जो मिल गये हो" गीत सादर करुन आणखी नशा चढवली. रसिक श्रोते ताळ्यावर आले ते सट्टाबाझार ह्या चित्रपटातील "तुम्हे याद होगा हम तुम मिले थे" ह्या हेमंत वायाळ व अॕड. सौ.उमा धापते ह्यांनी अप्रतिमरित्या सादर केलेल्या द्वंद्वगीतामुळे.              आकांक्षा व हेमंत यांचं दिल्ली का ठग मधलं "ये राते ये मौसम नदीका कीनारा" हे धुंद करणारं द्वंद्वगीतामधे आकांक्षा ह्या लहानगीने जी समज दाखवून गायलं त्याला तोड नाही. आकांक्षा हेमंत दोघांनाही मनापासून सॕल्यूट. ह्या नंतर अॕड. सौ.उमा धापते यांनी अमरप्रेम मधलं "बडा नटखट है ये" हे गाण अगदी लोरी गातात तसं तल्लीनतेने गाऊन खळी पडलेल्या शर्मिला टागोरची आठवण जागी करुन दीली. त्यातून रसिक जागे होतात न होतात तोच हेमंत वायाळांनी कार्यक्रमातील अप्रतिम असे मुकेशजींचे गीत सुंदरपणे सादर केले.          रसिकांपर्यंत वायाळांनी ह्या गाण्यातला दर्द पोहचवून वातावरण भावस्पर्शी करुन टाकले. श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले ते म्हणजे आमच्या निवेदिका जादुगार मधुगंधा इंद्रजित यांच्या सहज सुंदर शैलीतल्या ओघवत्या माहीतीपूर्ण निवेदनाने आॕनलाईन प्रेक्षकांना सुद्धा  एका जागेवर खिळवून ठेवले. तीचे करावे तितके कौतुक कमीच होईल.

 
  
        शाहरुख ऐश्वर्या, उदित नारायण लता मंगेशकर, जतिन ललित ह्या काॕम्बिनेशनच्या मोहब्बते ह्या चित्रपटातील गाणं "हमको हमीसे चुरालो" ह्या गाण्याने मंगेश व उमा ह्यांनी गायलेल्या लाजवाब प्रणय गीताने श्रोत्यांना बसल्या जागेवर डोलायला लावले. सुंदर अशा व्हायोलिनच्या सुरांबरोबर उमाच्या मस्त आलापाने रसिक ओलेचिंब झाले.           ह्या नंतर आमच्या लीटल चॕम्पने आकांक्षा भोईरने डाॕन मधलं "ये मेरा दिल प्यारका दीवाना" ह्या गाण्याने रसिकांच्या मनाचा ताबा घेतला. निळ्या घा-या डोळ्यांची हेलन बिजली सारखी नाचतेय आणि श्रोते ह्या सुरांच्या वर्षावात डुंबून गेले. अशी एकाहुन एक भन्नाट गाणी नंतर सादर झाली की श्रोते ह्या  सुरांच्या महफिलीत सुरांच्या हींदोळ्यावर झुलायला लागले.          शोलेचं फैमस दोस्ती गीत "ये दोसती हम नही तोडेंगे, मंगेश-हेमंत, शशी शबाना ह्या जोडीचं फकीरा गीत "तोता मैनाकी कहानी" हेमंत-उमा, मराठी गाणं "राजा ललकारी अशी दे" व "दिल्लगीने दी हवा" ही गाणी बाप-बेटीने म्हणजेच आकांक्षा-मंगेश भोईरने, उमा-मंगेशचं "हमने घर छोडा है" अशा धुंद-फुंद प्रभावशाली गाण्यांनी ही सुरांची महफिल सजवली गेली.              आणि शेवटी सर्व कलाकारांनी उत्स्फुर्तपणे "ह्रदयी वसंत फुलतांना" ह्या मराठी गाण्यावर ताल धरला व सगळी महफिल सुरात न्हाऊन गेली. ह्या आॕनलाईन कार्यक्रमास रसिकांचा प्रचंड व मनसोक्त प्रतिसाद मिळाला, प्रथेप्रमाणे ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे संस्थापक श्री राजेश जाधव व अध्यक्ष श्री अरुण दळवी यांनी उपस्थित रसिक व कलाकारांचे आभार मानून कार्यक्रमाची इतिश्री केली.

Post a Comment

0 Comments