गांधारी पुलाच्या खांबाला अडकलेल्या काळ्या कपड्याने उडवली प्रशासनाची झोप


पुलाला तडे गेले नसल्याची पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांची माहिती...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  पुलाला तडे गेल्याच्या कारणास्तव काल रात्री घाईघाईत कल्याण पडघा मार्गावरील गांधारी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला खरा. मात्र आज पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत ते तडे नाही तर काळे कापड आणि गवत असल्याचे आढळून आले आणि सर्वांनीच कपाळावर हात मारले.              कल्याण - पडघा मार्गाला जोडणारा काळू-उल्हास नदीवर बांधण्यात आलेला गांधारी पूल हा दळण वळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरामध्ये याठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याच पुराच्या पाण्यामध्ये वाहून आलेले गवत आणि काळा कपडा गांधारी पुलाच्या खांबाला अडकला.               पडघा दिशेकडील मधल्या खांबाला हे काळे फडके अडकून पडले होते. पूर ओसरल्यानंतर पाहणीसाठी आलेल्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना हे काळे फडके म्हणजे पुलाला तडा गेल्यासारखे दिसून आले. त्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात फोटो काढून त्याची पाहणी केली असता हा तडाच असल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी काढला.               आणि मग त्यानूसार मग पुढची सगळी शासकीय सूत्रे फिरली आणि सोमवारी रात्री हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. कल्याणहुन पडघ्याकडे जाणारी आणि पडघ्याहून कल्याणकडे येणारी अशी दोन्हीकडची वाहतुक पोलीस प्रशासनाने बंद केली. अचानक वाहतूक बंद केल्याने गांधारी पुला पलीकडे राहणाऱ्या नागरिकांची मात्र मोठीच गैरसोय झाली.                  त्यामुळे रात्री 11 नंतर या पुलावरील एसटी बस, खासगी बसेस, मालवाहतूक करणाऱ्या गाड्या, फोर व्हीलर आणि टू व्हीलर अशी सर्वच प्रकारची वाहतूक ठप्प झालेली पाहायला मिळाली. तर अनेक नागरिकांनी गांधारी पुलाच्या अलीकडे आपापल्या गाड्या लावून चालत जाणे पसंत केलं.           काही नागरिकांना सिलेंडर देखील उचलून न्यावा लागला. तर पुलाला तडे गेले नसल्याचे आढळून आले असले तरी या पुलावरून पुन्हा वाहतूक सुरू करण्यासाठी वरिष्ठांना अहवाल पाठवल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पीडब्ल्यूडी अधिकारी अविनाश भानुशाली यांनी दिली.           दरम्यान रात्री 11 वाजता वाहतुक बंद केलेल्या गांधारी पुलाची पाहणी करण्यासाठी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना तब्बल 15 तास  लागले. विशेष म्हणजे सकाळी काही तास या पुलाची पाहणी करण्यासाठी लागणारी बोटही अनेक तासानंतर उपलब्ध झाली. यावरूनच एवढ्या मोठ्या प्रकरणात प्रशासनाच्या कार्यतत्परतेचा अंदाज येऊ शकतो.            तर संबंधित घटनास्थळी पीडब्ल्यूडी विभागाचा केवळ एकच अधिकारी उपस्थित होता. त्यातही आता पाहणीमध्ये पुलाला तडे गेले नसल्याचे दिसून आल्याने शासकीय विभागाच्या आणखी एका भोंगळ कारभाराचे दर्शन झाले. 

Post a Comment

0 Comments