चिपळूण मध्ये ठाणे महापालिकेच्या वतीने साफसफाई, आरोग्य तपासणी मोहीम सुरु पहिल्याच दिवशी २०० व्यक्तींची आरोग्य तपासणी


■ठाणे महानगरपालिकेच्या वतीने चिपळूण परिसरात आरोग्य, घनकचरा आणि अग्निशमन पथकांमार्फत सुरु असलेल्या कामांची छायाचित्रे...


ठाणे , प्रतिनिधी  :  चिपळूणमध्ये पुरपरिस्थिती मुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने पाठविण्यात आलेल्या पथकांमार्फत साफसफाई, आरोग्य तपासणी मोहीम सुरु झाली असून आज पहिल्याच दिवशी परिसराची साफसफाई करण्यासोबतच २०० व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली.

   

        ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेची विविध पथके चिपळूण येथे रवाना करण्यात आली आहेत.         महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे व उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने महापालिकेची ही पथके काम करत आहेत. यावेळी उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आणि आगार व्यवस्थापक दिलीप कानडे यांच्या अधिपत्त्याखाली साफसफाई, आरोग्य तपासणीचे कार्य सुरु आहे.


   

           चिपळूण परिसरात कुठलाही साथरोग उद्भवू नये यासाठी ३ वैद्यकीय पथकामार्फत स्थानिक नागरिकांच्या तपासण्या सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये जवळपास २०० व्यक्तींची रॅपिड ॲटीजन टेस्ट, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस तसेच मलेरिया तपासणी करण्यात आली असून चिखल्या आजाराचे रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांवर डॉ. प्रमोद पाटील, डॉ. श्रीकांत ठाकरे व डॉ. नितीन पाटील यांच्या वैद्यकीय पथकामार्फत उपचार करण्यात येत आहेत.


        तसेच शंकरवाडी चिपळुण येथे ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागातील कर्मचारी व चिपळूण नगर परिषद यांच्या समन्वयाने सर्व परिसराची साफसफाई करण्यात येत असून फायलेरिया कर्मचाऱ्यांकडून सोडियम हायपोक्लाराईड औषधाची फवारणी करण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे अग्निशमनदलाच्यावतीने प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या माध्यमातून चिपळूण एसटी स्टॅन्ड, बाजारपेठ व इतर परिसराची साफसफाई करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments