म्हातार्डी - भरोडी कारशेड दरम्यान बुलेट ट्रेनच्या प्रवाशांसाठी पूल उभारा खासदार कपिल पाटील यांची सुचना

 भिवंडी, दि . 16 (प्रतिनिधी) : मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या म्हातार्डी स्थानक आणि भरोडी कारशेड यांना जोडण्यासाठी पूल उभारण्यात यावा. या पुलामुळे भिवंडी तालुक्यातील नागरिकांना बुलेट ट्रेनचा फायदा घेता येईल, अशी आग्रही मागणी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी केली आहे. मुंबई-अहमदाबाद अति जलद बुलेट रेल्वे प्रकल्पातील बाधितांचे पुनर्वसन व पुनर्वसन वसाहत समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर होते.            या बैठकीला बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. बुलेट ट्रेनला मुंबईनंतर ठाण्यातील म्हातार्डी येथे थांबा देण्यात आला. मात्र, हे स्थानक रस्ते मार्गाने भिवंडीपासून दूर आहे. म्हातार्डी व भरोडी यांच्यात केवळ खाडी आहे. खाडीच्या ठिकाणी पुल उभारल्यास भिवंडीवासियांना बुलेट ट्रेनने प्रवास करता येईल. त्यातून अहमदाबादकडे जाणाऱ्या नागरिकांची सोय होऊ शकेल, असे खासदार कपिल पाटील यांनी सांगितले.                 केवणी दिवे बाबत बैठक होणार  बुलेट ट्रेनमुळे भिवंडी तालुक्यातील १२ गावे बाधित होत असून, या गावातील ७५ टक्के जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. मात्र, केवणी दिवे येथील ग्रामस्थांचा भूसंपादनास विरोध आहे. केवणी दिवेलगतच्या खारबाव व कोपर येथे जमिनीसाठी जास्त दर देण्यात आला आहे. मात्र, तुलनेने केवणीदिवेत कमी दर आहे. या संदर्भात खारबाव व कोपरप्रमाणे जादा दर दिल्यास शेतकरी जमीन द्यायला तयार होतील, अशी सूचना खासदार कपिल पाटील यांनी केली. त्याबाबत तत्काळ विचार करणार असल्याचे आश्वासन बुलेट ट्रेनचे अधिकाऱ्यांनी दिले.               बुलेट ट्रेन संपादनाबाबत २ वर्षापूर्वी झालेल्या बैठकीला शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी बाधित गावांना सीएसआर निधी देण्याचे बुलेट ट्रेनच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते. मात्र, त्याबाबत कार्यवाही न झाल्याबद्दल खासदार कपिल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी या संदर्भात येत्या आठ दिवसात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले. या बैठकीत बाधित गावातील सरपंच यांनाही आमंत्रित करण्याची सूचना खासदार कपिल पाटील यांनी केली. ती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली.


Post a Comment

0 Comments