भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नांने वाडा ग्रामीण रुग्णालय होणार १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय

भिवंडी दि  (प्रतिनिधी)  : वाडा ग्रामीण रुग्णालयात बेड वाढविण्याची वर्षानुवर्षांची ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. भिवंडीचे  खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयाला १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.


          पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वाडा हे महत्वाचे शहर आहे. या ठिकाणी अनेक वर्षांपासून ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले होते. त्यात वाडा तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागाबरोबरच, विक्रमगड, कुडूस, अघई परिसरातील रुग्ण येत होते. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे रुग्णालयाच्या प्रशासनाला मर्यादा येत होत्या. रुग्णालयातील बेडची क्षमता संपल्यानंतर रुग्णांना भिवंडी वा ठाणे येथे पाठविले जात होते. त्यात सामान्य रुग्णांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत होता.


          या पार्श्वभूमीवर  भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात बेड वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. या रुग्णालयात १०० बेडची व्यवस्था करून रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याची मागणी खासदार कपिल पाटील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे ७ जानेवारी रोजी पत्रान्वये केली होती. त्यानंतर राज्य सरकारने नुकताच १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा अधिग्रहीत करून तेथे इमारत उभारण्याबरोबरच नव्या पदांची निर्मिती लवकरच करण्यात येणार आहे, असे आरोग्य विभागाचे अवर सचिव संजीव धुरी यांनी काढलेल्या अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे वाडा परिसरातील हजारो रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments