पालिका आयुक्त, पोलीस उपायुक्तांनी केली दुकाने आणि हॉटेल्सची पाहणी


■नियम पाळा अन्यथा निर्बंध आणखी कठोर – केडीएमसी आयुक्त....


कल्याण , कुणाल म्हात्रे    :  कल्याण  डोंबिवलीमध्ये वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या पाहता कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दुकाने आणि हॉटेल्सला अचानक भेटी देत पाहणी केली. यावेळी कोवीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर लगेचच सील करण्याची कारवाई करण्यात आली.

कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या ४ दिवसांपासून सतत ५०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केडीएमसीकडून कोवीडबाबत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये या निर्बंधांचे पालन होताना दिसत नाहीये. त्यामुळे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डीसीपी विवेक पानसरे यांच्यासह कल्याणात गर्दीची ठिकाणे असणाऱ्या दुकाने आणि रेस्टॉरंटला अचानक भेट दिली. त्यामध्ये रामबाग मॅक्सी ग्राऊंडसमोर असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानात सोशल डिस्टन्स आणि इतर नियम न पाळल्या प्रकरणी हे दुकान सील करण्याची कारवाई केली. तसेच गोविंदवाडी येथील एका नामांकित हॉटेलमध्येही आयुक्त डॉ. सूर्यवंशी आणि डीसीपी पानसरे यांनी भेट दिली.कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे रुग्ण लक्षणीयरीत्या वाढू लागले आहेत. मात्र त्यानंतरही काही दुकाने आणि रेस्टॉरंटमध्ये कोवीड नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे आम्ही आज अचानक हा पाहणी दौरा केल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. कल्याण डोंबिवलीमध्ये विशेष पथके बनवण्यात आली असून ही पथके दररोज विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत. तसेच लोकांनी सोशल डिस्टन्स आणि मास्क घालणे बंधनकारक असून तसे न झाल्यास येत्या काळात निर्बंध आणखी कठोर करण्याचा इशाराही डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिला.

Post a Comment

0 Comments