दुकानांच्या पी१ पी२ बाबत केडीएमसी अधिकारीच संभ्रमात व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण

 कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्यास आणि शनिवार, रविवारी पी१, पि२ प्रमाणे दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. आज शनिवार असल्याने रस्त्याची नेमकी कोणती बाजू पी१ आणि पी२ प्रमाणे सुरु ठेवायची याची पूर्ण माहिती केडीएमसी अधिकाऱ्यांनाच नसल्याने याबाबत अधिकारी संभ्रमात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. तर काल आम्हाला आज पी१ प्रमाणे दुकाने सुरु ठेवण्यास सांगितले, मात्र आज सकाळी येऊन दुकाने बंद करण्यास सांगितल्याने व्यापारी देखील चांगलेच संतप्त झाले आहेत.


       कल्याण डोंबिवलीतील वाढती कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असून अनेक निर्बंध देखील लावण्यात आले आहेत. यामध्ये दुकानांसाठी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ ची वेळ असून हॉटेल, बारला सकाळी ७ रात्री ११ ची वेळ देण्यात आली आहे. बार आणि हॉटेलला ११ पर्यंतची वेळ वाढवून दिल्याने आधीच दुकानदार व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यातच आज शनिवार असल्याने शनिवार आणि रविवारी पि१, पि२ प्रमाणे रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सुरु तर एका बाजूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र या आदेशाची अमलबजावणी करतांना केडीएमसी अधिकारी कोणती बाजू पि१ आणि कोणती बाजू पि२ ठेवायची या संभ्रमात आहेत.


       कल्याण आग्रारोडवरील भिवंडी दिशेच्या दुकानदारांना आज दुकाने सुरु ठेवण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे दुकानदारांनी दुकाने सुरु देखील केली मात्र दुकाने उघडल्यावर केडीएमसी अधिकाऱ्यांनी येऊन आज समोरची लाईन सुरु असून तुमची दुकाने बंद करा असे सांगितल्याने व्यापारी चांगलेच संतप्त झाले. या संतप्त दुकानदारांनी एकत्र येत केडीएमसी प्रशासनाच्या कारभाराविरोधात रोष व्यक्त केला. तर संध्याकाळी ७ वाजता दुकान बंद करतांना दुकानात ग्राहक असतांना देखील पोलीस आणि केडीएमसीकडून दुकाने बंद करण्याची सक्ती करण्यात येते. दुकानात महिला ग्राहक असल्याने दुकानाचे शटर लावता येत नाही. त्यामुळे केडीएमसी प्रशासनाने याबाबत थोडा वेळ सहकार्य  करण्याची मागणी दुकानदार करत असल्याची माहिती जयेश सावला या दुकानदारांनी दिली.      


                दरम्यान याबाबत क प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांना विचारले असता, पी१, पि२ बाबत व्यापाऱ्यांमध्ये चुकीची माहिती गेली होती. याबाबत पोलिसांसोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढला असून पी१ पी२ बाबत व्यापाऱ्यांपर्यंत लाउडस्पीकरच्या सहाय्याने योग्य माहिती पुरवली जाईल असे त्यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments