जागतिक जलदिना पर्यंत वालधुनी नदी बचावासाठी सप्ताहभर विविध आंदोलने वालधुनी नदी स्वच्छता समितीचा पुढाकार
कल्याण (कुणाल म्हात्रे) : वालधुनी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात रसायने सोडली जात असल्याने हि नदी आहे का नाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. या नदीच्या बचावासाठी वालधुनी नदी स्वच्छता समिती काम करत असून येत्या २२ मार्च रोजी असलेल्या जागतिक जल दिनापर्यंत  सप्ताह भर विविध आंदोलने करण्यात येणार आहेत. वालधुनी नदी स्वच्छता समितीची रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.


वालधुनी नदी बचावासाठी पर्यावरण मंत्री, जिल्हा अधिकारी, पालकमंत्री, पालिका आयुक्त, कल्याण तहसीलदार, पाटबंधारे विभाग महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ संबंधित अधिकारीवर्गाकडे वालधुनी नदीची वृद्धी वाढवा, खोली वाढवा, नदी प्रदूषण मुक्त करा, नदीमध्ये भराव टाकत आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावा अशी वालधुनी नदी स्वच्छता समितीचे पदाधिकारी मागील पाच वर्षापासून सतत मागणी करत आहेत. मात्र संबंधित अधिकारी आपले हितसंबंध जपण्यासाठी नदीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप समितीने केला आहे.  


वालधुनी नदीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन २२ मार्चपर्यंत सप्ताहभर नदीच्या ठिकाणी साखळी निदर्शने करण्याचे ठरवले आहे. नदीच्या संदर्भात नदी आपली आई आहे हे मनाशी बाळगून नदीचा ताबडतोब गाळ काढण्यावर भर देण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी एकत्र निर्णय घेतलेला आहे. या समितीमध्ये अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी, सचिव आर्किटेक गणेश नाईक, उपाध्यक्ष पंकज डोईफोडे, कार्याध्यक्ष विनोद शिरवाडकर, सुनिल सिताराम उतेकर, सतीश मोरे, कैलास तौर आदींसह  इतर अनेक नागरिक सहभागी आहेत.


सप्ताहभर चालणाऱ्या या आंदोलनात वालधुनी नदीशी संबंधित विभागाला पत्र व्यवहार, सोशल मिडीया, प्रिंट मिडीयाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती, पूर्वीची वालधुनी, आताची वालधुनी आणि भविष्यात वालधुनी नदी कशी असावी या विषयावर निबंध स्पर्धा,  प्रत्येक सोसायटीच्या अध्यक्ष सेक्रेटरी यांना भेटून आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात येणार आहे.


वालधुनी नदीला येणाऱ्या पुरामुळे वालधुनी नदीच्या परिसरातील योगी धाम, गुरु आत्मन, त्रिमूर्ती कॉलोनी, शिव अमृत धाम, रॉक गार्डन, फ्लोरा माउंट, अनुपन नगर, घोलप नगर, भवानी नगर, फॉरेस्ट सोसायटी, पौर्णिमा टॉकीज परिसर, शहाड जकात नाका, बंदर पाडा या परिसारत नदीच्या पुराचे पाणी शिरते. यासाठी याठिकाणी कोरोनाचे नियम पाळून जनजागृती करण्यात येणार आहे. प्रदूषण मंडळाकडे नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी कोणताही निधी उपलब्ध नसल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती अधिकारात मिळालेली आहे.


यापूर्वी समितीतर्फे वालधुनी नदीच्या पाण्याच्या बॉटल प्रदूषण मंडळाला भेट दिल्या होत्या. तर नदीसाठी भिक मांगो आंदोलन, पोस्टकार्ड पाठवणे आदी आंदोलने करण्यात आली आहेत.  उल्हासनगर महानगरपालिका,  अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका तेथील नदी पात्रातील गाळ काढू शकतात तर केडीएमसी का नाही असा सवाल देखील समितीने उपस्थित केला असून  कल्याण मध्ये नदीच्या किनारी कोणतीही झोपडपट्टी अथवा अतिक्रमण  नसल्याने गाळ काढण्यास सहज शक्य होईल असा अंदाज वर्तवला आहे.


वालधुनी नदीलगतच स्मार्टसिटी अंतर्गत सिटी पार्क उभारण्यात येत असून या सिटीपार्कवर जो खर्च केला जात आहे तोच खर्च वालधुनी नदीच्या स्वच्छतेसाठी खर्च केला तर याठिकाणी पर्यटन स्थळ होईल असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे. तसेच नदी पात्राच्या परिसरात नव्या बांधकामाला परवानगी देताना तळमजला पार्किंगसाठी राखीव ठेवून परवानगी देण्यात यावी हि मागणी देखील समितीने पालिकेकडे केली आहे.  

Post a Comment

0 Comments