कोविड सेंटर मध्ये विनय भंग झालेल्या महिलेच्या उपचा राकडे दुर्लक्ष


उपचारासाठी महिलेला खाजगी रुग्णालयात हलविले...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  दोन दिवसांपूर्वी कल्याणमधील लालचौकी येथील केडीएमसीच्या आर्ट गॅलरी जंबो कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित आरोपीला अटक देखील केली मात्र या घटनेनंतर विनयभंग झालेल्या या महिलेच्या उपचाराकडे येथील डॉक्टर, नर्सेसने दुर्लक्ष केल्याचा आरोप पिडीतेच्या कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे या महिलेला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले असल्याची माहिती समाजसेवक अजय सावंत यांनी दिली.


       कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत असल्याने कल्याण पश्चिमेतील लाल चौकी येथे उभारण्यात आलेले जंबो कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचा तेथे काम करणाऱ्या वार्डबॉयने विनयभंग केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कोविड सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित आरोपीला अटक देखील केले. मात्र या घटनेनंतर या महिलेच्या उपचाराकडे येथील डॉक्टर्स आणि नर्सेसने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप पिडीतेच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच महिलेच्या आजूबाजूला उपचार घेणाऱ्या इतर रुग्णांनी देखील या महिलेशी बोलणं बंद केल्याचे त्यांनी सांगतिले. या प्रकाराचा या महिलेने धसका घेतल्याने याची माहिती पिडीतेच्या कुटुंबीयांनी समाजसेवक अजय सावंत यांना दिली.       या घटनेची माहिती मिळताच सावंत यांनी आय.एम.ए चे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क करून कल्याण मधील मीरा हॉस्पिटल येथे उपचाराची व्यवस्था केली. या महिलेला आता या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून या महिलेच्या उपचाराचा सर्व खर्च अजय सावंत हे करणार आहेत. दरम्यान पुरोगामी महाराष्ट्रात एका पिडीत महिलेला अशी वागणूक मिळणे हे अतिशय निंदनीय असून सर्वांनी एकत्र येत अशा घटना थांबविल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे. तर कोविड सेंटर मधील महिलांच्या सुरक्षेसाठी महिला वार्डात महिला डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी देखील महिलावर्गालाच ठेवून रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.         

Post a Comment

0 Comments