रेल्वेच्या हद्दीतील रिक्षा स्टॅण्ड ८ दिवसांत हटविण्याच्या रेल्वेच्या सूचना
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण रेल्वे स्टेशन बाहेरील जागा आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरायची असल्याने रेल्वेच्या हद्दीत असलेले रिक्षा  स्टॅण्ड ८ दिवसांत हटविण्याच्या सूचना रेल्वेने केल्या असून तसे न झाल्यास रिक्षांवर  कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वेने नोटीसमध्ये नमूद केले आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून आरटीओवाहतूक पोलीसपोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तांना नोटीस पाठवली असून रिक्षा स्टॅण्ड वरील फलकावर देखील हि नोटीस लावण्यात आली आहे. यामुळे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येत आणखी भर पडणार आहे.


कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वेच्या हद्दीत असलेल्या जागेचा वापर अनेक वर्षापासून रिक्षा स्टॅन्डसाठी वापरली जात आहे. रेल्वेच्या हद्दीत उल्हासनगरलालचौकीकडे जाणार्या शेअर रिक्षाचे स्टन्ड असून याखेरीज हजारो रिक्षा वाहतुकीचा रस्ता अडवून उभ्या राहणाऱ्या रिक्षा वाहतूक कोंडी वाढवत आहेत. यामुळेच स्टेशन परिसरातील पार्किंग हटवून इतरत्र मोकळ्या जागेत पार्किंगची सुविधा सुरु करण्याचा पालिका आणि वाहतूक विभागाकडून प्रयत्न सुरु असतानाच रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा स्टॅण्डवर रेल्वेची गाज पडली आहे. रिक्षा सेवा हि प्रवाशांची सोय नसल्याचे सांगत कल्याण रेल्वे स्थानक पश्चिमेकडील रेल्वे हद्दीतील रिक्षा स्टॅण्ड हटवले जावेत यासाठी रेल्वेकडून ७ दिवसाची नोटीस देण्यात आली आहे.


रेल्वे स्थानकातील प्रवेश द्वारावरच रिक्षा उभ्या केल्या जात असल्यामुळे रेल्वे प्रवाशाची मोठी गैरसोय होत असल्याचे स्पष्ट करतानाच रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा मीटर प्रमाणे धावणाऱ्या असाव्यात असेही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी तत्काळ या नोटीसची दखल घेत रेल्वेच्या हद्दीतील रिक्षा ह्टवाव्यात आणि रेल्वे हद्दीलगत फक्त एका रांगेतच रिक्षा थांबा असावा असे आदेश नोटीसीद्वारे रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.


 रेल्वेच्या हद्दीतील मोकळी जागा रेल्वेला आपत्कालीन कामासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत लागणाऱ्या गोष्टीची साठवून करण्यासाठी आवश्यक असल्याने हि जागा रिक्षा स्टन्ड मुक्त करावी असे आदेश रेल्वेकडून १७ मार्च रोजी देण्यात आले असून पुढील ७ दिवसात म्हणजेच २४ मार्च पर्यत हे स्टन्ड हटवले न गेल्यास संबधित रिक्षावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेच्या हद्दीतील रिक्षा देखील बाहेर आल्यास आणखीनच वाहतूकीची समस्या निर्माण होणार असल्याने पालिका आयुक्त आणि वाहतूक पोलीस आरटीओ यावर कोणता मार्ग काढणार याकडे रिक्षा चालकाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments