महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर शहापूर येथील मेळाव्यात ४२ थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान
कल्याण: ०७ मार्च २०२१  :  महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या व  महावितरणकडून अंमलबजावणी सुरु असलेल्या 'कृषिपंप धोरण-२०२०' अंतर्गत चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करणाऱ्या शहापूर उपविभागातील कृषिपंप ग्राहकांचा रविवारी प्रमाणपत्र देऊन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल याच्या हस्ते सन्मान करण्यात आला. योजनेच्या अनुषंगाने 'महाऊर्जा कृषी अभियान पर्वा'च्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर पोहचत योजनेची माहिती देऊन नवीन कृषिपंप वीजजोडणी देण्यात आली. चालू वीजबिल भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांना थकबाकीवर जवळपास ६६ टक्के सवलत देणाऱ्या या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी पंचक्रोशीतील कृषिपंप ग्राहकांना केले. 


शहापूर उपविभागातील नांदवळ (किन्हवली) येथे रविवारी आयोजित 'महावितरण आपल्या बांधावर' कार्यक्रमात कृषिपंपाच्या चालू वीजबिलासह थकबाकी भरलेल्या ३५ शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तर या कार्यक्रमातच ७ शेतकऱ्यांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून महावितरणला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात शहापूर पंचायत समितीचे सदस्य शांताराम महादेव सासे आणि दत्तात्र्यय मंगल दिनकर यांची मोलाची भूमिका असून मुख्य अभियंत्यांकडून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 


शहापूर उपविभागातील एक लाख रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या 'लाखमोलाच्या' दहा कृषिपंप ग्राहकांनी थकबाकीमुक्त झाल्याबद्दल मुख्य अभियंत्यांनी त्यांचे विशेष आभार मानले. भरणा केलेल्या थकबाकीतून ३३ टक्के संबंधित गावातील वीज यंत्रणेवर व तितकीच रक्कम जिल्ह्याच्या वीज यंत्रणेवर खर्च करण्याची योजनेतील तरतूद ऐतिहासिक व शेतकऱ्यांच्या लाभाची असल्याचे प्रतिपादन करत पंचायत समिती सदस्य व शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. 


याप्रसंगी कार्यकारी अभियंता राजीव रामटेके, शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार, सहाय्यक लेखापाल विशाल सानप, सहाय्यक अभियंता अविनाश शिरसागर, चेतन वाघ, विश्वजित खैतापुरकर, कनिष्ठ अभियंता त्र्यंबक कदम व किन्हावली शाखेतील सर्व जनमित्र व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments