टिटवाळा फाटक वेळेत उघडून नागरिकांची गैरसोय टाळा
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :    टिटवाळा रेल्वे फाटक वेळेवर उघडत नसल्याने येथील नागरीकांची होणारी गैरसोय आणि त्यामुळे होणारी दररोजची वाहतुक कोंडी कमी करून टिटवाळा वासीयांची या त्रासापासून सुटका करावी या मागणीचे लेखी निवेदन सोमवारी कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने  टिटवाळा रेल्वे स्टेशन मास्तर आणि रेल्वे सुरक्षा बल अधिकारी यांना भेटुन दिल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष विजय दिशेकर यांनी दिली.


 

टिटवाळा पूर्व आणि पश्चिमेला जाण्यासाठी एकच रेल्वे फाटक असून त्या रेल्वे फाटक येथे होणारी वाहतुक कोंडी बाबत आम्ही संघटनेतर्फे याआधीही संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यात रविवार  ७ मार्च दुपारी १.१४ वाजेपासुन ते १.४४ वाजेपर्यंत तब्बल ३० मिनिटांनी हा फाटक उघडला गेला. त्यामुळे येथे भरपुर वाहतुक कोंडी झाली ती सुरळीत व्हायला तब्बल दिड तास गेला. यात सर्वसामान्यांचे भरपुर हाल होऊन मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे या घटनेची चौकशी होऊन संबधित कर्मचा-याच्या हलगर्जी पणावर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.   या रेल्वे फाटक बाबतच्या  नियंत्रणात रेल्वे प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत असल्याने येथे सामान्य नागरिकांना तासनतास ताटकळत उभे रहावे लागते. सध्या लग्न सराईचे दिवस आहेत शिवाय काही जण कोरोना महामारी पार्श्वभूमीवर नागरिक उपचारार्थ बाहेर पडत आहेत.


 माञ रेल्वे गेट वरील नियंञणात रेल्वे स्थानिक कर्मचाऱ्यांकडून  सावळागोंधळ जास्त दिसतोय. या ठिकाणी १५-२० मिनिटे गेट बंद राहिला तर पुढे होणारी वाहतुक कोंडी सुटायला तब्बल तासभर लागतो. येथे रेल्वे सुरक्षा बलाचा कर्मचारी २४ तास तैनात ठेवला व गेट उघडताना येथे हलगर्जी झाली नाही तर निश्चितच येथे वाहतुक कोंडी होणार नाही. याशिवाय यातून रेल्वेचे वेळापञक कोमडणार नाही.


संघटनेतर्फे या समस्येवर क.डो.म.न पा कडेही पाठपुरावा करतोय जेणेकरून रेल्वे व पालिका यांच्यात समन्वय साधून आरओबी नव्याने बांधण्यात यावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे या समस्येवर कायमचा तोडगा निघेल असे  विजय देशेकर यांनी  सांगितले. 

Post a Comment

0 Comments