कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात गोळीबार

 

■नगरसेवक नवीन गवळी यांच्या वाढदिवसाच्या ठिकाणची घटना....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : शिवसेना नगरसेवक नवीन गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या गर्दीतील काही तरुणांचा बाहेरील तरुणांशी वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन गोळीबार झाल्याची घटना कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात घडली आहे. तर या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सोशल डिस्टसींगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.  


केडीएमसीचे नगरसेवक नवीन गवळी यांचा बुधवारी वाढदिवस होता. रात्री १२ वाजताच गवळी यांचे शेकडो समर्थक त्यांच्या चक्कीनाका परिसरात असलेल्या कार्यालयासमोर जमा झाले. नगरसेवक गवळी यांचा वाढदिवस गाजावाजा करीत साजरा करण्यात आला. यावेळी सोशल डिस्टसींगचा पुरता फज्जा उडाला होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर नवीन गवळी हे त्यांच्या घरात गेले. त्यानंतर त्यांच्या कार्यालयासमोर त्यांचे काही समर्थक उभे असताना त्याठिकाणी निलेश गवळी आणि महेश भोईर हे दोघे जण आले.


निलेश गवळीचे काही महिन्यापूर्वी जगदीश राठोड नावाच्या तरुणासोबत भांडण झाले होते. निलेश आणि जगदीश यांच्यात चर्चा सुरु असताना निलेश सोबत असलेल्या महेश भोईर याने वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले व याच दरम्यान महेशने रिव्हॉल्वर काढत देवा मुर्तीचंद भोईर आणि मारुती डोंगरे यांच्या दिशेने गोळीबार केला. एक गोळी रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला भेदून गेली. यामुळे याठिकाणी गोंधळ उडून पळापळ झाली.


या प्रकरणात कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधीही काही नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये अनेकदा हाणामारी झाली आहे. मात्र गोळीबार झाल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हा गोळीबार महेश भोईर याच्या परवानाधारक पिस्तुलातून झाला असून यामध्ये कोणीही जखमी झाले नसून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून ठोस कारवाई केली जाईल असे कल्याणचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments