सरकारी करणाच्या जोखडातून मंदिरे मुक्त करण्यासाठी राष्ट्रव्यापी लढा उभारण्याची आवश्यकता


■देशभरातील विविध राज्यांतील मंदिर विश्‍वस्त मंदिरांच्या रक्षणासाठी एकवटले मंदिर संस्कृति-रक्षा राष्ट्रीय अधिवेशन ऑनलाइन संपन्न...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  सरकारीकरणाच्या जोखडातून मंदिरे मुक्त करण्यासाठी राष्ट्रव्यापी लढा उभारण्याची आवश्यकता असून यासाठी देशभरातील विविध राज्यांतील मंदिर विश्‍वस्त मंदिरांच्या रक्षणासाठी एकवटले आहेत. याबाबत मंदिर संस्कृति-रक्षा राष्ट्रीय अधिवेशन ऑनलाइन संपन्न झाले.


देशभरात सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये होत असलेला प्रचंड भ्रष्टाचार; लाखो एकर भूमीची झालेली लूट; वर्ष २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मंदिरे भक्तांकडे पुन्हा देण्याचा निर्णय देऊनही त्याची न झालेली अंमलबजावणी; अनेक राज्यांत केवळ हिंदु मंदिरांचे कायदे करून सर्रासपणे केले जाणारे सरकारीकरण; हिंदु मंदिरांतील देवनिधीचे आणि भूमीचे अन्य पंथीयांना होत असलेले अनाठायी वाटप; कथित समानतेच्या आणि आधुनिकतेच्या नावाखाली मंदिरातील प्राचीन प्रथा-परंपरांवर घालण्यात येणारे निर्बंध; पारंपारिक पुजार्‍यांना हेतूतः हटवण्यासाठी चाललेल्या मोहिमा; मंदिर व्यवस्थापनात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अन्य पंथीय अधिकार्‍यांच्या होणार्‍या नियुक्त्या; तसेच धर्मांधांकडून मंदिरांवर होत असलेले अतिक्रमण, आक्रमण अन् मूर्तींची तोडफोड आदी विविध प्रकारे देशभरातील मंदिरांवर आघात करून मंदिर संस्कृती नष्ट करण्याचे मोठे षड्यंत्र चालू आहे.


मंदिरांवर होणार्‍या या सर्व आघातांच्या विरोधात आता हिंदूंनी संघटित होऊन राष्ट्रव्यापी लढा उभारण्याची आवश्यकता आहे, असे ऑनलाईन ‘मंदिर संस्कृति-रक्षा राष्ट्रीय अधिवेशना’मध्ये देशभरातून सहभागी झालेल्या २२ हून अधिक मान्यवरांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. ‘मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ’ अन् ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने हे पहिलेच अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.


अमरावती येथील ‘शिवधारा आश्रमा’चे संत डॉ. संतोषकुमार महाराज आणि सनातन संस्थेचे पूर्वोत्तर भारत धर्मप्रसारक नीलेश सिंगबाळ यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करून अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला. या अधिवेशनामध्ये देशभरातून एक हजारहून अधिक संत, मंदिर विश्‍वस्त, धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी, पुजारी, पुरोहित, अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला. 


हे अधिवेशन फेसबूक, यू-ट्यूब आणि ट्वीटर या माध्यमांतून २० हजार ४३० लोकांनी पाहिले. अधिवेशनाच्या आरंभी ‘मंदिर सरकारीकरणाचे दृष्परिणाम आणि मंदिरांवरील आघात’ याविषयीची एक ध्वनीचित्रफित दाखवण्यात आली, तर शेवटी मंदिर संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विविध ठराव मांडण्यात आले. हे सर्व ठराव एकमताने ‘हर हर महादेव’च्या जयघोषात संमत करण्यात आले.     

Post a Comment

0 Comments