संपत्तीच्या वादातून घरात घुसून चुलत आजोबांची हत्या


■चुलत आजोबाचा मृत्यू तर काका जखमी आरोपी नातुला पोलिसांनी घेतले ताब्यात.....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पश्चिमेतील बेतुरकर पाडा परिसरात सकाळी साडेसहाच्या सुमारास हर्षद ठाणगे नावाच्या तरुणाने आपले चुलत आजोबा नारायण ठाणगे आणि चुलत काका दिनेश ठाणगे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात नारायण ठाणगे यांचा मृत्यू झाला तर दिनेश ठाणगे हे गंभीर जखमी झाले आहेत. संपत्तीच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणी आरोपी हर्षद ठाणगे याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.


मृतक नारायण यांच्यासह दोन भावांच्या नावाने बेतूरकर पाडा परिसरात एक भूखंड होता. हा भूखंड २०१२ साली एका बांधकाम विकासकाला इमारत बांधकामासाठी दिला होता. त्यांनतर बांधकाम विकासकाने ठरलेल्या प्रमाणे इमारतीमधील एक दुकानाचा गाळा तिन्ही भावांना दिला. मात्र आरोपीचे आजोबा कुंडलिक यांनी या गाळ्यावर हक्क सांगितल्याने मृतक नारायण यांनी न्यायालयात आरोपीच्या आजोबांविरोधात दावा केला. 


 याच वादातून आरोपी हर्षने आज सकाळच्या सुमाराला चुलत आजोबा नारायण यांच्या घरात घुसुन त्यांच्यावर धारदार खंजीरने वार केले.  यामध्ये नारायण यांच्या मृत्यू झाला.  तर वडिलांवर हल्ला होत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी नारायणचा मुलगा दिनेश बचावासाठी आला असताआरोपीने त्यालाही खंजीर भोसकून गंभीर जखमी केले आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.


       घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलीसांचे पथक घटनस्थळी दाखल होऊन पंचनामा करीत नारायणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या रुख्मिणी बाई रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर पोलिसांनी याच परिसरातून आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कुबली पोलिसांना दिल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास व.पो.नि. नारायण बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी जाधव हे करत आहेत. 

Post a Comment

0 Comments