मुंब्रा वासियांची वाहतूक कोंडीतून मुक्तता विरोधी पक्षनेत्यांच्या प्रयत्नांना यश
ठाणे (प्रतिनिधी) - गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्रा ते कौसा दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु होते. या कामाच्या अखेरच्या टप्प्यातील कौसा ते तन्वर नगर पेट्रोल पंप दरम्यान असलेले अडथळे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी दूर केले आहेत. त्यामुळे या  रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून आता मुंब्रा-कौसावासियांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. 


मुंब्रा-कौसा भागाचा विकास करण्याच्या अनुषंगाने डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रस्ता रुंदीकरणाचे काम जलदगतीने हाती घेण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या देखरेखीखालीच हे काम सुरु होते. मात्र, मुंब्रा भागातील   दाटीवाटीची वस्ती, रस्त्यालगतची दुकाने, महावितरणचे ट्रान्स्फार्मर, भूमिगत वीजवाहिन्या मल:निस्सारण वाहिन्या यामुळे अनेक ठिकाणच्या रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरु होते. अश्रफ शानू पठाण हे विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी तत्काळ महावितरणचे अधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी आदींची बैठक घेऊन रुंदीकरणाचे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 


त्यानुसार, येथील सर्व अडथळे दूर करुन या रस्त्याचे काम वेगवान पद्धतीने सुरु केले होते. वाहतुकीला अडथळा येऊ नये, यासाठी हे काम रात्री सुरु करुन पहाटे पाच वाजेपर्यंत केले जात होते. अखेर  शुक्रवारी हे काम पूर्ण झाले. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास  कौसा ते तन्वर नगर पेट्रोल पंप दरम्यानचा रुंद झालेला रस्ता वाहतुकीस मोकळा करुन देण्यात आला. हा रस्ता रुंद झाल्याने येथील वाहतूक कोंडीची समस्या आता निकाली निघाली आहे. 


या संदर्भात शानू पठाण यांनी, ‘गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा-कौसा भागाचा कायापालट केला आहे. त्यांनी या भागातील रस्ता रुंदीकरणाचे काम तत्काळ करुन घेण्याचे आदेश दिले होते. अरुंद रस्त्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या कायम भेडसावत होती. तसेच, अपघातही घडत होते. त्यामुळेच हे काम युद्धपातळीवर हाती घेऊन रुंद झालेला रस्ता आज वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे, असे सांगितले.

Post a Comment

0 Comments