भिवंडी ग्रामीण शहापूरच्या विकासा साठी शिरसाड - वासिंद नव्या महा मार्गाची मागणी खासदार कपिल पाटील यांचे मंत्री नितीन गडकरी यांना पत्र

कल्याण   ( शंकर जाधव )  मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-आग्रा महामार्ग जोडण्यासाठी शिरसाड ते वासिंद दरम्यान नवा राष्ट्रीय महामार्ग उभारावा, अशी महत्वपूर्ण मागणी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली. त्याचबरोबर कल्याण-मुरबाड रस्ता, माळशेज बोगदा आणि घाटाच्या कामाबरोबरच ५४८ अ महामार्गाच्या निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी केली.


          भिवंडी लोकसभा मतदारसंघातून मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-आग्रा महामार्ग जातो. या दोन्ही महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. या दोन्ही महामार्गाला जोडणारा राज्य मार्ग शिरसाड-अंबाडी नाका-पडघा-वासिंद असा अस्तित्वात आहे. या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्यास ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल. तसेच या भागाचा औद्योगिक परिसर म्हणून विकास होण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर ठाणे, भिवंडी शहरात होणारी मोठी वाहतूक कोंडी टळू शकेल, याकडे खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधले आहे.


            त्याचबरोबर भिवंडीतील गोडाऊन हबसाठी हा रस्ता एक वरदान म्हणून सिद्ध होईल, असे खासदार कपिल पाटील यांनी नमूद केले आहे. ग्रामीण भागाच्या विकासाबरोबरच वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शिरसाड ते वासिंद महामार्गाला मंजुरी द्यावी, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली. कल्याण-मुरबाड चौपदरी रस्ता आणि माळशेज घाटात साडेसात किलोमीटर बोगदा व रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणीही खासदार कपिल पाटील यांनी केली. कल्याण-मुरबाड रस्त्यावर वाहनांचे अपघात होऊन अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या मार्गावरून नगर आणि मराठवाड्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे या रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली.

Post a Comment

0 Comments