आरटीई मधील विद्यार्थ्याना पाठ्य पुस्तके देण्यास ट्री हाउस शाळेचा नकार

■शिक्षण आरोग्य अधिकार मंचने केली शाळेबाहेर निदर्शने तर केडीएमसी शिक्षण विभागाने पुस्तके देण्याच्या केल्या शाळेला सूचना...


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  राईट टू एज्युकेशन या कायद्याअंतर्गत एडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना कल्याण पश्चिमेतील ट्री हाउस शाळेने पाठ्यपुस्तके मोफत देण्यास नकार दिल्याने आरटीई शिक्षणासाठी लढणाऱ्या शिक्षण आरोग्य अधिकार मंचने पालकांसमवेत शाळेच्या बाहेर निदर्शने केली. तर याबाबत केडीएमसी शिक्षण विभागाने आरटीईतील विद्यार्थ्यांना   पाठ्यपुस्तके देण्याच्या सूचना शाळेला पत्राद्वारे केल्या आहेत.   


       राईट टू एज्युकेशनचा कायद्यानुसार शाळेमध्ये हजर होणाऱ्या बालकांस मोफत पाठयपुस्तकेलेखन साहित्य व गणवेश मिळण्यास ते हक्कदार असेल असा नियम आहे. त्यानंतर शासनाने अनेक वेळा काढलेल्या परिपत्रकांमध्ये हे पाठयपुस्तकेलेखन साहित्य व गणवेश शाळेने दयायचे आहे असे सांगितले आहे. असे असताना देखील ट्री हाऊस शाळा पाठयपुस्तकेलेखन साहित्य व गणवेश विद्यार्थ्यांना देण्यास तयार नाहीत. शाळेकडून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके विकत घेण्यास सांगत असून त्यासाठी सुमारे ४ हजार रुपये फी आकारत आहेत.


याबाबत शिक्षण आरोग्य अधिकार मंचने शाळा प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील पाठ्यपुस्तके देण्यात न आल्याने शाळेबाहेर निदर्शने करत आंदोलन केले. तसेच कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शिक्षण मंडळाला देखील पत्र पाठवत शाळेच्या मनमानी कारभाराबाबत लक्ष वेधले. संविधानाचा मुलभूत अधिकार नाकारले जाणे योग्य नसून ज्या सुविधा कायदयाने आर टी ई बालकांना दिल्या आहेत त्या सर्व सुविधा मिळण्यास आर टी ई बालके हक्कदार आहेत हे शाळांना समजवावे आणि पालकांच्या तक्रारी निकालात काढाव्यात अशी मागणी यावेळी शिक्षण आरोग्य मंचचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अॅड. नितीन धुळे यांनी केली आहे. याबाबत शाळा प्रशासनाने बोलण्यास मात्र नकार दिला आहे.  


       तर पालकांच्या आंदोलनाची आणि पत्राची दखल घेत केडीएमसी शिक्षण विभागाने ट्री हाऊस शाळेला पत्र पाठवत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य व गणवेश पुरविण्याबाबत सूचना केल्या आहेत. आरटीई  कायद्यानुसार शाळेने पाठ्यपुस्तके, गणवेश देणे बंधनकारक असतांना या शाळेने या नियमाचा भंग केला असून हि अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे हे साहित्य तीन दिवसात विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याचे आदेश केडीएमसी शिक्षण विभागाने ट्री हाउस शाळेला दिले असल्याची माहिती केडीएमसी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी जे. जे. तडवी  यांनी दिली.

Post a Comment

0 Comments