Header AD

म्हाडाद्वारे जास्तीत जास्त परवडणारी घरे निर्माण करण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करणार


■क्लस्टर योजनेत सिडको पालिकेप्रमाणेच म्हाडाने देखील सहभागी व्हावे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली अपेक्षा....


ठाणे, प्रतिनिधी  :-  ठाणे जिल्ह्यातील परवडणाऱ्या घरांची गरज लक्षात घेता शक्य ते सारे प्रयत्न करू अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोकण म्हाडातर्फे ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 8984 घरांची सोडत आज काढण्यात आली त्यावेळी त्यांनी ही बाब स्पष्ट केली.           कोकण म्हाडातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोडतीला सर्वसामान्य नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. 8 हजार 984 घरांसाठी तब्बल अडीच लाख नागरिकांनी अर्ज केले. याचाच अर्थ नागरिकांना परवडणाऱ्या घरांची नितांत गरज असून त्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.          नगरविकास खात्याची जबाबदारी स्वीकारल्या नंतर आपण बंधकाम क्षेत्रातील सामायिक नियमावली लागू करून सुसूत्रता आणली. या निर्णयाचा इतर संस्थापरमाणेच म्हाडाला देखील लाभ मिळाला. म्हाडाचा पुनर्विकासातील एफएसआय अडीच वरून तीन करण्यात आला. कोरोनानंतर प्रत्येक इमारतीत आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती .          त्यानुसार नवीन धोरणात प्रत्येक इमारतीत 1 मजला मोकळा ठेवणे बंधनकारक करून तो एफएसआय फ्री केला. म्हाडाच्या 33/7 आणि 33/9 या योजनेअंतर्गत होणाऱ्या पुनर्विकासाला देखील वाढीव एफएसआय दिला या सगळ्यांचा परिणाम सर्वसामान्य माणसाला होणार असून त्याच स्वतःच घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे त्यानी सांगितले.           ठाणे शहरातील मुंब्रा कौसा आणि वागळे इस्टेट परिसरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी आम्ही सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीनी ठाणे ते विधानभवन मोर्चा काढल्यानंतर कुठे क्लस्टरचा निर्णय झाला होता. आज ठाणे महानगरपालिका आणि सिडकोच्या माध्यमातून नवीन क्लस्टर योजना आकारास येत आहे. या योजनेद्वारे धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली लागणार असून नागरिकांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायमची दूर होणार आहे.            ही फक्त गृहनिर्माण योजना नसून त्याद्वारे शाळा, खेळाची मैदाने, रुंद रस्ते, बागा अशा सर्व सुविधांनी युक्त असे नवीन शहरच आकाराला येणार आहे. त्यामुळे या योजनेत पालिका आणि सिडको प्रमाणेच म्हाडाने देखील सहभागी होऊन एखादं क्लस्टर आपल्याद्वारे विकसित करावे, अशी अपेक्षा श्री. शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच, जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे शहरात गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी 25 एकर जमिनीची मागणी केली होती. त्याबाबत जिल्हाधिकारी स्तरावर बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याची ग्वाही दिली.             कोरोनाचा फटका बसून राज्य शासनाला सर्वच आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागत असूनही विक्रमी वेळेत ही सोडत जाहीर केल्याबद्दल श्री. शिंदे यांनी गृहनिर्माण विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकाळात हा विभाग अत्यंत कुशलतेने काम करत असल्याबद्दल श्री. शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, आज ज्या नागरिकाना या सोडतीत घर मिळाल्याने गृहप्राप्तीचे स्वप्न पूर्ण झाले त्यांना देखील श्री. शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. 


 

           यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, म्हाडा महामंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, विधानपरिषदेचे आमदार रवींद्र फाटक आणि म्हाडाचे अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.

म्हाडाद्वारे जास्तीत जास्त परवडणारी घरे निर्माण करण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करणार म्हाडाद्वारे जास्तीत जास्त परवडणारी घरे निर्माण करण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करणार Reviewed by News1 Marathi on October 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads