Header AD

टिटवाळ्यातील गणेशवाडी परिसरातील नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित


■महापालिकेला कर भरून देखील नागरिक उपेक्षित डॉ. बाबासाहेब राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा आंदोलनाचा इशारा...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये समावेश असून त्यादृष्टीने विकासाची कामे देखील मोठ्या जोमात सुरु आहेत. मात्र कल्याण पासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या महापालिका हद्दीतील टिटवाळा येथील गणेशवाडी परिसरातील नागरिक मात्र मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. पालिका प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून येथील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून न दिल्यास डॉ. बाबासाहेब राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उग्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश सचिव संगीता वशिष्ठ यांनी दिला आहे.       प्रभाग क्र. १० गणेश मंदिर टिटवाळा येथे गणेश वाडी परिसर असून याठिकाणी सुमारे २ हजार हून अधिक नागरिक सुमारे १० ते १५ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. महापालिकेला वेळोवेळी मालमत्ता कर भरून देखील येथील नागरिकांना पिण्याचे पाणी, रहदारीसाठी रस्ता आणि रस्त्यावर पथदिव्यांची व्यवस्था नाही. कित्येक दिवस याठिकाणी कचरा पडून असून कचरा उचलला जात नसल्याने याठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर गणेश वाडी पासून मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी याठिकाणी रस्ताच नसून चिखलातून वाट काढत येथील नागरिकांना सुमारे एक ते दीड किलोमीटर चालत जावे लागत आहे. यामुळे महिला, जेष्ठ नागरिक, लहानमुले, गरोदर स्त्रिया, आजारी रुग्ण यांचे जास्त हाल होत आहेत.       आम्ही गेल्या १५ वर्षापासून याठिकाणी राहत असून पालिकेने कोणत्याही सुविधा आम्हाला दिलेल्या नाहीत. दरवर्षी निवडणुका येतात तेव्हा लोकप्रतिनिधी फक्त मते मागायला येतात. मतदानानंतर लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. तर हा परिसर खूप आत असून रस्त्याची व्यवस्था नसल्याने रात्री अपरात्री नागरिक पाय घसरून पडल्याच्या घटना याठिकाणी घडल्या असल्याची माहिती येथील महिला रहिवासी जयश्री माने यांनी दिली.    


  

तर आम्ही महापालिकेला नियमित कर भरतो मात्र पालिका आमची घरे अनधिकृत असल्याचे कारण सांगून समस्या सोडविण्यासाठी दुर्लक्ष करते. या चाळी बांधतांना यांच्यावर कारवाई का केली नाही असा संतप्त सवाल येथील जेष्ठ नागरिक मंगलप्रसाद विश्वकर्मा यांनी उपस्थित केला आहे. येथील नागरिक त्यांच्या समस्या घेऊन आमच्याकडे आले असून येथील नागरिकांना पाणी, रस्ता आणि इतर मुलभूत सुविधा पुरविणे महापालिकेची जवाबदारी असून या नागरिकांना या सुविधा लवकर न मिळाल्यास महापालिका मुख्यालयासमोर उग्र आंदोलन करण्याचा इशारा डॉ. बाबासाहेब राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव संगीता वशिष्ठ यांनी दिला आहे.          दरम्यान याबाबत अ प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांना विचारले असता, कचरा उचलणाऱ्या कामगारांच्या संपामुळे येथील कचरा उचलला गेला नसून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कचरा उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. तर येथील रस्त्याबाबत बांधकाम विभागाला कळविले असल्याचे त्यांनी सांगितले.

टिटवाळ्यातील गणेशवाडी परिसरातील नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित टिटवाळ्यातील गणेशवाडी परिसरातील नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित Reviewed by News1 Marathi on August 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads