Header AD

लाखो ठाणेकरांना ठाणे पालिका पाजते अशुद्ध पाणी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केला पर्दाफाश


■शुद्धी करणाचे 22 पैकी 11 युनिट बंद शुद्धी करण केंद्रातच उगवली झाडे क्लोरीनेशन प्लांटही बंद शुद्धी करण केंद्रात दारुच्या बाटल्यांचा खच सुधारणा न झाल्यास पाणी फेको आंदोलन...ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे पालिकेच्या टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात स्टेमकडून घेतलेल्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया  करण्यात येत असते. मात्र, या शुद्धीकरण केंद्राची पुरती वाताहत झालेली आहे. या केंद्रामधील शुद्धीकरणाची 22 पैकी 11 युनिट आणि क्लोरीनेशनचा एक प्लांट बंदावस्थेत असून ज्या ठिकाणी वाळूमार्फत पाणी गाळमुक्त करण्यात येत असते; त्याच ठिकाणी मोठ्याप्रमाणात झाडे उगवली आहेत.          त्यामुळे ठाणेकरांना चक्क अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा पर्दाफाश विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी आह टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन केला. विशेष म्हणजे, या जलशुद्धीकरण केंद्राचे कार्यकारी अभियंता पांड्ये हे या ठिकाणी अनेक दिवस फिरकतच नसल्याचेही उघडकीस आले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर, दिनेश बने हे उपस्थित होते. 
            विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांना भिवंडी नजीकच्या टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्राची वाताहत झाली असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी सदर ठिकाणी अचानक पाहणी केली. ठामपाच्या इतिहासात विरोधी पक्षनेत्यांनी अशा पद्धतीने दौरा करुन जलशुद्धीकरणाच्या कारभाराचा पर्दाफाश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.         या पाहणीमध्ये जलशुद्धी करण केंद्राचे ‘अशुद्धीकरण’ झाले असल्याचे  निदर्शनास आले. स्टेमकडून ठाणे महानगर पालिका साधारणपणे 120 दशलक्ष लिटर्स पाणी घेऊन ते साधारणपणे आठ टप्प्यांमध्ये पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येत असते. मात्र, या ठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण होण्याऐवजी अशुद्ध असलेले पाणीच ठाणेकरांच्या घरामध्ये वितरीत केले जात असल्याचे दिसून आले. स्टेमकडून उचलेले पाणी शुद्ध करण्यासाठी साधारणपणे 22 प्रकारचे युनिट आहेत. त्यापैकी 11 युनिट गेल्या सहा महिन्यांपासून बंदच आहेत. 
        मात्र, त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. पाण्यातील राळारोडा गाळून घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या छोट्या छोट्या ओढ्यासदृश्य पन्हाळ्यांमध्ये वाळू टाकण्यात येत असते. ही वाळू ठराविक कालावधीनंतर बदलावी लागते. मात्र, ती बदलण्यात आलेली नसल्याने त्या ठिकाणी चक्क झाडोरा उगवला आहे. गवताचे रान त्यामध्ये माजलेले असल्याचेही दिसून आले. स्टेमकडून पाणी घेतल्यानंतर त्याचे वितरण करण्याआधी दोनवेळा क्लोरीनचा डोस देण्यात येत असतो.          मात्र, शुद्धीकरणानंतर पाण्याचे क्लोरीनेशन करण्याची प्रक्रियाच गेल्या एक वर्षापासून बंद असल्याचे तसेच क्लोरीन सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी यंत्रणाच नसल्याचे येथील कर्मचार्‍यांनीच अश्रफ शानू पठाण यांना सांगितले.  या शुद्धीकरण केंद्राची पाहणी करताना अनेक ठिकाणी रिकाम्या दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला असल्याचेही दिसून आले. ज्या ठिकाणी पाणी शुद्धीकरण केले जात आहे. त्याच ठिकाणी रिकाम्या बाटल्यांचा खच दिसून आला.


■ठाणेकरांच्या जीवाशी का खेळता- शानू पठाण


  ठाणे शहरात 25 लाख लोकांना ठाणे पालिकेच्या वतीने पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, आजची ही स्थिती पाहिल्यानंतर कर देणार्‍या ठाणेकरांना रोगराई देण्याचे काम ठामपाकडून सुरु असल्याचेच दिसून येत आहे. या ठिकाणी कार्यरत असलेले कार्यकारी अभियंते पांड्ये हे गेल्या दहा दिवसांपासून सदर ठिकाणी फिरकलेले नाहीत. या जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीचा ठेका ज्या ठेकेदाराला देण्यात आलेला आहे.           त्याच्यावर कोट्यवधी रुपयांची उधळण केली जात आहे. मात्र, येथे बंद असलेली साधने सुरु करण्याचे औदार्य ठेकेदाराकडून दाखविले जात नाही. येथील कामगारांच्या सुरक्षेच्याही कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. आता कोरोनाचा काळ सुरु आहे. मात्र, ठाणेकर कोरोनाऐवजी काविळ, उलटी, जुलाब, कॉलरा, टायफॉईड या आजारानेच मरतील, याची जबाबदारी प्रशासन घेणार आहे का?,          असा सवाल करुन या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तत्काळ विशेष महासभेचे आयोजन करण्यात यावे अन् या जलशुद्धीकरण केंद्राचेच ‘शुद्धीकरण’ करावे; या ठिकाणी कार्यरत असलेले अधिकार्‍यांसह ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा; ठेकेदाराचा ठेका रद्द करुन त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी शानू पठाण यांनी केली.


   


       

  दरम्यान, जनहिताच्या या प्रश्नासाठी आपण गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर उतरण्यास तयार असून माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी ठाणेकरांच्या जीविताशी मी कोणतीही तडजोेड करणार नाही, असेही पठाण यांनी सांगितले.


■आठ दिवसात सुधारणा न झाल्यास पाणीफेको आंदोलनदेखभालीसाठी नियुक्त केलेला ठेकेदार, पालिकेचे अधिकारी यांच्यामाध्यमातून ठाणेकरांना शुद्ध पाणी देण्याऐवजी अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. लाखो ठाणेकर शुद्ध पाण्यासाठी पाणीपट्टी भरत असताना त्यांना अशुद्ध पाणी पाजण्याचे पाप ठाणे पालिका प्रशासन करीत आहे. टेमघर जलशुद्धीकरणातील ही यंत्रणा येत्या आठ दिवसात जर पालिकेने सुधारली नाही.          तर, गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनावर ‘पाणी फेको’ आंदोलन करण्यात येईल. अन् ते पाणी कसे असेल हे अधिकार्‍यांना माहितच असेल, असा इशारा विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर यांनी दिला.

लाखो ठाणेकरांना ठाणे पालिका पाजते अशुद्ध पाणी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केला पर्दाफाश लाखो ठाणेकरांना ठाणे पालिका पाजते अशुद्ध पाणी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केला पर्दाफाश Reviewed by News1 Marathi on July 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads