Header AD

पत्रकारांना विशेष पॅकेज मिळावे यासाठी पंतप्रधानांकडे आग्रह धरणार : ना. रामदास आठवले


 मुंबई, शनिवार : पत्रकारांना कोरोनाच्या काळात विशेष पॅकेज मिळावे, यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह धरणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिणार आहे, अशी ग्वाही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज दिली. कोरोना देवदूत पुरस्काराचे मानकरी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांसाठी दिलेल्या अन्नधान्याच्या कीटचे वाटप करताना ते बोलत होते.              मुंबई मराठी पत्रकार संघात आज अन्न धान्याच्या मोफत कीट वाटपाचा शुभारंभ ना. आठवले यांच्या हस्ते करण्यात आला. पत्रकार भवनात या कीटचे वितरण करताना ना. आठवले यांनी श्री. रामशेठ ठाकूर यांच्या सामाजिक कार्याचा मुक्त कंठाने गौरव केला. ते म्हणाले, रामशेठबरोबर मी संसदेत काम केले आहे. ते स्वच्छ अंत:करणाचे आणि सरळ मनाचे दानशूर नेते आहेत. मी त्यांना दिर्घ आयुरारोग्य चिंतीतो. 


   

             समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे होते. कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र शासनाने पत्रकारांना वाऱ्यावर सोडले असल्याची खंत श्री. वाबळे यांनी व्यक्त केली. ना. आठवले यांनी पंतप्रधानांकडे पत्रकारांची बाजू मांडावी, असे आवाहन त्यांनी केले. तो धागा पकडून ना. आठवले म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात अनेक पत्रकारांची वेतन कपात झाली असून बऱ्याच पत्रकारांना नोकऱ्यांना मुकावे लागले आहे. ते पुढे म्हणाले की, कोरोनाच्या काळात पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. इतर राज्यात पत्रकारांना सवलती दिल्या जात असताना राज्य सरकार पत्रकारांची दखल का घेत नाही?            असा सवाल त्यांनी केला. पत्रकारांना अशा आपत्कालीन परिस्थितीत सरकारने मदत करण्याची गरज असून त्यांना विशेष पॅकेज मिळावे, यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आग्रह करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार हे फ्रंटलाईन वर्कर असून कोरोनाच्या भयावह काळात जीव धोक्यात घालून वृत्तसंकलनाचे काम करत आहेत. आघाडीवर राहून काम करणाऱ्या घटकांप्रमाणे सरकारने पत्रकारांना देखील फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा, असे आठवले म्हणाले. यावेळी आठवले यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात काही पत्रकार, कॅमेरामन व छायाचित्रकारांना अन्नधान्याच्या कीटचे वाटप करण्यात आले.


          

             अन्नधान्याचे कीट पत्रकार संघास दिल्याबद्दल माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुधाकर काश्यप, कार्यवाह विष्णू सोनवणे व संयुक्त कार्यवाह खलिल गिरकर उपस्थित होते.

पत्रकारांना विशेष पॅकेज मिळावे यासाठी पंतप्रधानांकडे आग्रह धरणार : ना. रामदास आठवले पत्रकारांना विशेष पॅकेज मिळावे यासाठी पंतप्रधानांकडे आग्रह धरणार : ना. रामदास आठवले Reviewed by News1 Marathi on June 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads