Header AD

हवामान बदलामुळे महाराष्ट्रातील कृषी उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता
मुंबई/महाराष्ट्र, ३० जून २०२१ : इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल कॅम्युनिटीज (आय.एस.सी.) या संस्थेच्या अहवालानुसार हवामान बदलामुळे महाराष्ट्राला वाढत्या जोखमीचा सामना करावा लागतो आहे, ज्याचा परिणाम सोयाबीन, कापूस, गहू आणि हरभरा या चार प्रमुख पिकांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. 'महाराष्ट्रातील शेतीवर हवामान बदलाचा परिणाम' या अहवालात राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश या विभागातील ८ जिल्ह्यांच्या पर्जन्यमान आणि तापमान यांच्या आकडेवारीचे आठवडानिहाय ३० वर्षांचे ऐतिहासिक (१९८९-२०१८) आणि पूर्वानुमान (२०२१-२०५०) परीक्षण केले आहे.   आय.एस.सी.चे जल आणि कृषी कार्यक्रमाचे सहयोगी संचालक रोमित सेन म्हणाले, “या अहवालात सादर केलेल्या विश्लेषणामध्ये, क्लायमेट मॉडेलिंग आणि पूर्वानुमान (दोन्ही, ऐतिहासिक आणि भविष्यातील) व पीक फेनोलॉजी (प्रत्येक वाढीच्या टप्प्यावर पिकासाठी इष्टतम परिस्थिती) यावर भाष्य केले आहे.या परीक्षणामध्ये समुदायावर आधारीत सहभाग-मूल्यांकनाचा (शेतक-यांकडून पडताळणी) समावेश आहे शिवाय प्रत्येक पिकावर आणि शेतकऱ्यावर हवामान बदलांचा संभाव्य परिणाम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हे मूल्यांकन साप्ताहिक आकडेवारीनुसार केले आहे. हवामान विश्लेषणानुसार पावसाळ्यात (खरीप हंगाम) आणि हिवाळ्यात (रब्बी हंगाम) पीक फेनोलॉजीसह पाऊस आणि तापमानाचे पॅटर्न न जुळण्याबाबतही अंदाज वर्तविला जातो.”उशिरा सुरु होणारा पावसाळा आणि अधून मधून पडणारा दुष्काळ आणि पाऊस यामुळे सोयाबीन व कापूस यांच्या उगवण क्षमतेवर खूप परिणाम झाला आहे. तसेच खरीप हंगामाच्या मधोमध पडणारा मुसळधार पाऊस यामुळे बुरशीजन्य रोग, तण आणि कीटक यांची वाढ होण्याचा संभव वाढतो. याचा परिणाम सोयाबीनमधील शेंगा उत्पादनावर आणि कपाशीच्या बोड तयार होण्यावर होण्याची शक्यता आहे. पाण्याचा निचरा न होणारी जमीन आणि दमट परिस्थितीमुळे पिकांची मूळे सडण्यास उत्तेजन मिळेल, तसेच मातीतील पोषकद्रव्ये आणि खतांची परिणामकारकता कमी होईल. सोयाबीन आणि कापूस या परीक्षण केलेल्या खरीप पिकांसाठी फळ तयार होण्याच्या आणि परीपक्वतेच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा एकूण परिणाम उत्पादन आणि गुणवत्तेवर असेल.येणाऱ्या काही वर्षात गहू लागवडीसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे धान्य परिपकव होण्याच्या वेळी असणारे उच्च तापमान हे आहे. तापमानात वाढ झाल्याने दाण्यांचे वजन कमी होते आणि परीक्षणानुसार धान्य भरण्याच्या वेळीच तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. हरभरा लागवडीत शेंगा भरण्याच्या दरम्यान तापमानात अचानक वाढ दिसून येईल ज्याचा परिणाम म्हणजे शेंगा कमी भरून उत्पादनात घट होईल.इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल कम्युनिटीज येथे कंट्री डायरेक्टर म्हणून कार्यरत असेलेले श्री. विवेक अधिया म्हणाले, “रब्बी हंगामासाठी पावसाचा अंदाज फारच कमी किंवा जवळजवळ नाही, त्यामुळे पिके संपूर्णपणे सिंचनावर अवलंबून असतात. भूजल हे सिंचनासाठी पाण्याचे प्रमुख स्त्रोत असल्याने भूजल संचय साठ्यांवर दबाव वाढेल. शेतीवरील हवामानातील बदलत्या वातावरणाचा परिणाम कमी करण्यासाठी तपशीलवार हवामानविषयक आकडेवारी तयार करणे, ही माहिती शेतीविषयक निर्णय घेण्यासाठी उपयोगात आणणे, कृषी निविष्ठांची व साधनांची गुणवत्ता सुधारणे, चांगल्या लागवड पद्धतींबद्दल माहिती मिळवणे आणि संसाधनांच्या संवर्धनासाठी उत्तम व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.”उच्च तापमान, पाऊस आणि आर्द्रतेचे परिणाम यामुळे शेतक-यांना बाहेर काम करणे कठीण होईल. याव्यतिरिक्त, उष्णता आणि आर्द्रतेच्या वाढत्या घटनांचा तण काढणे आणि कापणी यासारख्या शेतीच्या कामांवरही परिणाम होईल. आय.एस.सी. महाराष्ट्रातील शेतक-यांसोबत शाश्वत शेती पद्धतींना चालना देण्यासाठी आणि हवामान बदलाच्या संभाव्य प्रभावांविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यानुसार शेतकऱ्यांनी शेती पद्धतीत सुधारणा करण्यासाठी कार्यरत आहे.

हवामान बदलामुळे महाराष्ट्रातील कृषी उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता हवामान बदलामुळे महाराष्ट्रातील कृषी उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता Reviewed by News1 Marathi on June 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads