Header AD

आयसोलेशन साठी अधिग्रहीत केलेल्या हॉटेल कडून लूटमार

 

ठामपाने आखून दिलेल्या दरापेक्षा आकारले जातात जादा दर


ठाणे (प्रतिनिधी) -  ठाणे महानगर पालिकेने माजीवडा येथील कॅपिटॉल हॉटेल आयसोलेशनसाठी अधिग्रहीत केले आहे. यासाठी प्रत्येक रुग्णाकडून 2 हजार रुपये आकारण्यात येणार असल्याचे ठामपाने जाहीर केले होते. मात्र, सदर ठिकाणी 3 हजार 500 रुपये आकारले जात असल्याचे मनसेचे प्रभाग अध्यक्ष महेश इंगळे यांनी उघडकीस आणले आहे. या संदर्भात त्यांनी सदर हॉटेलवर धडक देऊन जाब विचारला. 

   

            ठाण्यातील माजिवडा,घोडबंदर रोड येथील हॉटेल कॅपिटॉल हे हॉटेल हे कोविड -19 विषाणूचा संसर्ग झालेल्या परंतु लक्षण नसलेल्या रुग्णांना स्वतःच्या खर्चाने तपासणी आणि उपचार करून घेण्यासाठी आयसोलेशन सेंटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये  दाखल होणार्‍या रुग्णांसाठी प्रतिदिन रुपये 2,000 इतका दर निश्चित करण्यात आला असून यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण, चहा आणि रात्रीचे जेवण देण्यात येणार आहे, असे ठाणे महानगर पालिकेने 23 एप्रिल 2021 रोजी जाहीर केले होते.


          त्यानुसार, वृंदावन येथे राहणार्‍या एका महिलेने  मनसेचे प्रभाग अध्यक्ष महेश इंगळे यांच्यामार्फत कॅपिटॉल हॉटेलमध्ये आयसोलेशन रुम नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. महेश इंगळे यांनी सदर हॉटेलमध्ये संपर्क साधला असता, तेथे उपस्थित असलेल्या महिलेने एका रुग्णासाठी  साडेतीन हजार रुपये आकारण्यात येतील; जर एक खोली दोघांनी घेतली तर दोन हजार रुपये आकारण्यात येतील, असे सांगितले.


         दरम्यान, ठाणे महानगर पालिकेने स्पष्टपणे प्रती रुग्ण 2 हजार रुपये दर आकारण्याचे निश्चित केलेले असताना या हॉटेलकडून जादा दर आकारुन गरजवंतांची लूटमार केली जात असल्याचे इंगळे यांच्या ध्यानात आल्याने त्यांनी थेट हॉटेल गाठून व्यवस्थापनाला जाब विचारला. या वेळी इंगळे यांनी सांगितले की, कोरोनाच्या महामारीमध्ये सामान्य लोकांची सर्वच स्तरावर लूटमार सुरु आहे. मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी अशा लूटमारीविरोधात संघर्ष सुरु केला आहे. 


        आता नव्याने हॉटेल्सवाल्यांकडून अशी लूट सुरु झाली आहे. मनसे अशी लूटमार सहन करणार नाही. सामान्य रुग्णांची लूट करणार्‍या या हॉटेलवर ठामपाने कारवाई न केल्यास अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ठामपा मुख्यालयासमोर आंदोलन छेडू, असा इशारा दिला. तर, हाॅटेलचे व्यवस्थापक निश्चल पुजारी यांनी यावेळी सांगितले की, ठामपाकडून आम्हाला आमचे बिल दिले जात नसल्याने नाईलाजास्तव रूग्णांकडून जादा पैसे घ्यावे लागत आहेत.

आयसोलेशन साठी अधिग्रहीत केलेल्या हॉटेल कडून लूटमार आयसोलेशन साठी अधिग्रहीत केलेल्या हॉटेल कडून लूटमार Reviewed by News1 Marathi on May 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads