Header AD

जवाहर बाग स्मशान भुमीचा ताण वाढला स्थानिक रहिवाशी धुराने हैराण?

कर्मचाऱ्यांना अपुऱ्या सुविधा प्रभाग समिती निहाय मृतांवर अंत्य संस्कार करा सचिन शिंदे यांची मागणी....


ठाणे , प्रतिनिधी  :  कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर मृत्युचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे सध्या ठाण्यातील एकमेव स्मशानभुमी असलेल्या जवाहरबाग स्मशानभुमीवर ताण वाढू लागला आहे.रोजच्या रोज येथे सुमारे ५० च्या आसपास मृतदेह आणले जात आहेत.परंतु कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने आवश्यक मनुष्यबळावर देखील ताण वाढू लागला आहे.येथील कर्मचाऱ्यांना पीपीई कीट नाही,सॅनिटायझर नाही, तसेच या कर्मचाऱ्यांचे अद्यापही लसीकरण करण्यात आलेले नाही. 


            त्यातही आमदार,खासदार, नगरसेवकांच्या फोनमुळे हे कर्मचारी आणखीनच त्रसले आहेत.दुसरीकडे चार इलेक्ट्रीक शवदाहीनी असल्या तरी त्यातील तीन सुरु असतात तर एक बंद असते.शिवाय सतत मृतदेह जळत असल्याने येथे लावण्यात आलेल्या चिमणीतून धुर बाहेर न जाता तो आजूबाजूच्या परिसरात फैलावू लागला आहे.त्यामुळे येथील रहिवासी देखील हैराण झाला आहे. त्यामुळे यावर तत्काळ तोडगा काढून प्रभाग समिती निहाय असलेल्या स्मशानभुमींमध्येच त्या - त्या भागातील मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात यावे अशी मागणी कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केली आहे.


               ठाण्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. तर मागील काही दिवसापासून मृत्युदरही वाढू लागला आहे.परंतु पालिकेच्या दप्तरी केवळ रोज ५ ते ७ मृत्यु दाखविले जात आहेत.प्रत्यक्षात कोवीडसाठी असलेल्या तीन स्मशानभुमीत रोजच्या रोज १०० हून अधिक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत आहेत.त्यातही सर्वाधिक ताण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जवाहरबाग स्मशानभुमीवर आला आहे.येथे रोजच्या रोज ५० च्या आसपास मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.


           यामध्ये कोवीड रुग्णांबरोबरच कोवीड संशयीत रुग्णांचा देखील समावेश आहे. त्यामुळे येथील स्मशानभुमीतील अपुऱ्या मनुष्याबळावर ताण वाढला आहे.येथे फोन घेण्यासाठी देखील कोणीच नसल्याने फोन घेण्याचे कामही त्यांनाच करावे लागत आहे. तसेच आमदार, खासदार, नगरसेवक यांच्याकडून तो आपल्या प्रभागातील आहे,त्याच्यावर आधी अंत्यसंस्कार करा म्हणून दबाव येत आहे.त्यातही या कर्मचा:यांना पीपीई कीट नाही, सॅनिटायझर नाही,किंवा या कर्मचा:यांचे अद्यापही लसीकरण करण्यात आलेले नाही.त्यामुळे या कर्मचाऱ्यांना किमान सुविधा द्याव्यात अशी मागणी देखील आता केली जाऊ लागली आहे.


           दुसरीकडे येथे चार इलेक्ट्रीक शवदाहीनी असतांना त्यातील रोजच्या रोज एक तरी शववाहीनी नादुरुस्त असते.त्यामुळे तीन शवदाहीनीवर अंत्यसंस्कार केले जात आहे.त्यामुळे चिमणीवर देखील लोड येत असून,त्यातून धुर बाहेर जाण्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत.हा धुर चिमणीतून बाहेर न जाता आजूबाजूच्या परिसरात जात असल्याने येथील रहिवासी देखील आता या धुराच्या वासामुळे हैराण झाले आहेत.त्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात येत आहे.


           राज्य शासनाने आता लाकडावर देखील अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिलेली आहे.त्यामुळे महापालिकेने देखील प्रत्येक प्रभाग समितीनिहाय असलेल्या स्मशानभुमींच्या ठिकाणी त्या त्या भागातील मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी द्यावी,जेणेकरुन मृतांच्या नातेवाईकांना देखील जवळच्या स्मशानभुमीत जाता येणे शक्य होणार आहे.


             जवाहरबाग येथील स्मशानभुमीवर ताण वाढत आहे, त्यामुळे यावर महापालिकेने योग्य प्रकारे तोडगा काढणे गरजेचे आहे. येथील कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सोई सुविधा देऊन त्यांचा ताण हलका करण्यासाठी आवश्यक त्या कर्मचाऱ्यांची भरती करावी.तसेच प्रभाग समिती निहाय मृतांवर अंत्यसंस्कार केल्यास येथील स्मशानभुमीवर ताण हलका होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे महापालिकेने याचा तत्काळ विचार करुन त्यानुसार पावले उचलावी अशी मागणी शहर काॅग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केली आहे.                       

जवाहर बाग स्मशान भुमीचा ताण वाढला स्थानिक रहिवाशी धुराने हैराण? जवाहर बाग स्मशान भुमीचा ताण वाढला  स्थानिक रहिवाशी धुराने हैराण? Reviewed by News1 Marathi on April 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads