Header AD

कोरोना लसीकरणा बाबत जनजागृती करणे पडले महागात

 

कोरोना समुपदेशन समितीच्या अध्यक्षा विरोधात पालिका आयुक्तांची तक्रार नागरीकांना भडकविल्याचा आरोप....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम करणाऱ्या कोरोना समुपदेशन समितीच्या अध्यक्षाला कोरोना लसीकरणा बाबत सोशल मिडीयावर जनजागृती करणे चांगलेच महागात पडले आहे. सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून नागरिकांना भडकवल्याची तक्रार केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पोलिसांत केली असून याप्रकरणी पोलिसांनी अनिल काकडे यांचा जवाब नोंदविला आहे.

 

       


             

               गेल्या वर्षभरापासून कल्याण डोंबिवली तील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते अनिल काकडे यांनी कोरोना समुपदेशन समितीची स्थापना करून नागरिकांमध्ये विविध प्रकारे जनजागृती करण्यास सुरवात केली. यामध्ये मास्क वापरण्यास सांगणे, रक्तदान करणे, प्लाझ्मा दान करणे, रुग्णांना बेड्सची व्यवस्था करून देणे आदी विविध कामे समिती करत आहे. हे करत असतांनाच कल्याण डोंबिवलीतील लसीकरण केंद्रांवर नागरिकांना काय सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत हे तपासण्याचे आवाहन त्यांनी सोशल मिडीयावर एका पोस्टद्वारे केले.  


 

यामध्ये प्रत्येकाने लसीकरण केंद्रास भेट द्यावी. त्याठिकाणी नागरीकांकरीता सावलीची काय व्यवस्था आहे. तसेच बसण्यासाठी पुरेशा खुच्र्या आहेत का याची माहिती घ्यावी. त्याची माहिती समितीला द्यावी असे नागरीकांना आवाहन केले होते. ही पोस्ट काकडे यांनी काल बुधवारी दुपारी टाकली होती. या पोस्टची आयुक्तांनी दखल घेत ही पोस्ट नागरीकांना भडकविणारी असल्याचे सांगत पोलिसांकडे तक्रार केली आहे.


 सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी काकडे यांना बोलावून त्यांच्या विरोधात आयुक्तांची तक्रार आहे असे सांगितले. त्यानुसार काकडे यानी त्यांचा जबाब पोलिसांना लिहून दिला आहे. या पोस्ट द्वारे नागरीकांना भडकविण्याचा उद्देश नव्हता. समिती गेल्या वर्षभरापासून नागरीक आणि प्रशासनाला मदत करीत आहे. कोरोना जनजागृतीचे काम करीत आहे. सावली नसल्यास मांडव आणि पुरेशा खुच्र्या नसल्या खुच्र्या उपलब्ध करुन देणार या उद्देशाने ही पोस्ट केली असल्याचे काकडे यांनी सांगितले.



       दरम्यान या प्रकारानंतर नागरिकांमध्ये जनजागृती करणे, पालिकेच्या सोयी सुविधांचे वास्तव मांडणे हे पालिका आयुक्तांच्या जिव्हारी लागत असेल तर सर्वसामन्य नागरिकांना सुविधा कशा मिळणार असा सवाल नागरिक करत आहेत.  
कोरोना लसीकरणा बाबत जनजागृती करणे पडले महागात कोरोना लसीकरणा बाबत जनजागृती करणे पडले महागात Reviewed by News1 Marathi on April 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads