मास्क न लावल्यास होणार कोरोना चाचणी
■लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन केल्यास सबंधित मंगल कार्यालय, लॉन ३०एप्रिल पर्यंत सिल करणार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी...
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा चांगलेच कामाला लागले असून विना मास्क फिरणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करून पोझीटीव्ह रुग्णांची रवानगी थेट क्वारंटाईन सेंटर मध्ये करण्याचा इशारा पोलीस यंत्रणेने दिला आहे. तर लग्नसमारंभात नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित मंगल कार्यालय, लॉन ३० एप्रिल पर्यंत सिल करणार अशा सूचना पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज दिल्या.
वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून अंमलबजावणी करणेकामी संपन्न झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. भाजी मंडई व लग्न समारंभ यामधील गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा संभव जास्त असल्यामुळे या बाबींवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मंगल कार्यालय, लॉन येथे पोलिस व महापालिका कर्मचारी यांनी समारंभाच्या वेळी समक्ष उपस्थित राहून नियंत्रण ठेवावे, अशा सुचना अतिरिक्त पोलिस उपआयुक्त दत्ता कराळे यांनी यावेळी केल्या. त्याचप्रमाणे हॉस्टस्पॉट एरिया जवळ बॅरिकेड्स लावाव्यात म्हणजेच संबंधित परिसरातील नागरिक जागरुक राहतील असेही ते पुढे म्हणाले.
मास्क न घालणा-या नागरिकांवर महापालिका दंडनिय कार्यवाही करीत असूनही अजून अनेक नागरिक मास्क न घालता फिरतांना दिसून येतात, त्यामुळे त्यांच्यावर यापुढे कठोर कारवाईचा इशारा पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या बैठकीत दिला. मास्क न घालणा-या व्यक्तिंची ॲन्टीजेन टेस्ट करण्याच्या कारवाईस लवकरच सुरुवात केली जाईल. अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. मास्कच्या कारवाईसाठी पोलिसांनाही पावती पुस्तके दयावीत अशा सुचना अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्ता कराळे यांनी यावेळी दिल्या.
होम आयसोलेशन मधील रुग्ण बाहेर फिरतांना आढळल्यास त्याचेवरही कारवाई केली जाईल, असे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेच्या दुकानांबाहेर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन होण्यासाठी दुकानदारांनी सोशल डिस्टसिंगचे मार्कींग करावे आणि हे मार्कींग झाले आहे की नाही याची खातरजमा प्रभागक्षेत्र अधिका-यांनी व पोलिस प्रशासनाने करावी, असे निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
शासनाच्या निर्णयानुसार आज रात्रीपासून विविध नियमांची कल्याण डोंबिवलीत अंमलबजावणी केली जाणार आहे. सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत शहरांत जमावबंदी लागू असणार आहे. तर रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. त्याशिवाय विनामास्क फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवरील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असून अशा लोकांची रवानगी थेट कॉरंटाईन सेंटरमध्ये केली जाणार असल्याचे एसीपी अनिल पोवार यांनी मध्यमांशी बोलताना सांगितले. विनामास्क फिरणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन 500 रुपये दंड आकारला जाईल. त्यानंतर कल्याणात जुने महात्मा फुले पोलीस ठाणे आणि डोंबिवलीत रामनगर पोलीस ठाण्यात त्यांना नेण्यात येईल. या दोन्ही ठिकाणी उपस्थित डॉक्टरांकडून त्यांची कोवीड चाचणी केली जाणार असून त्यात पॉझिटिव्ह आढळणाऱ्या व्यक्तींना थेट आयसोलेशन सेंटरला पाठवण्यात येणार असल्याचेही एसीपी पोवार यांनी पत्रकाराना सांगितले. शासनाच्या वतीने लागू केलेल्या निर्णयावर अंमलबजावणीसाठी केडीएमसी आणि पोलीस प्रशासन वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली जाणार आहे.
या बैठकीस अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्ता कराळे, महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, पोलिस उप आयुक्त परिमंडळ-3 विवेक पानसरे, महापालिकेचे सर्व विभागीय उप आयुक्त,महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाँ. अश्विनी पाटील, महापालिका सचिव, संजय जाधव, महापालिका साथरोग नियंत्रण अधिकारी डाँ. पानपाटील, सहा. पोलिस आयुक्त अनिल पोवार, महापालिकेचे सर्व प्रभागक्षेत्र अधिकारी तसेच इतर पोलिस अधिकारी वर्ग उपस्थित होता.
Post a Comment