लाॅकडाऊन मध्ये केंद्र , राज्य सरकार आणि ठामपाने नागरिकांच्या रोजी रोटीची व्यवस्था करावी
ठाणे (प्रतिनिधी) : कोरोनाचे रूग्ण वाढीस लागले आहेत. त्यामुळे ठाण्यात नाईलाजास्तव लाॅकडाऊन लावावे लागले आहे. पण, या काळात गोरगरीबांचा रोजगार बुडीत जात आहे. याकडे लक्ष देऊन केंद्र राज्य आणि ठामपाने लाॅकडाऊन काळात नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवावे; लॉकडाऊन काळातीलसर्व शाळा- महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी ठामपाचे विरोधीपक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांनी केली आहे.
ठाणे पालिकेने लाॅकडाऊन जारी केल्यानंतर नागरिकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा काढण्याची मागणी करणारे पत्र शानू पठाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठामपा आयुक्तांना दिले आहे. यासाठी ठामपाने राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री ना. डाॅ. जितेंद्र आव्हाड आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृती आराखडा तयार करावा, अशीही मागणी पठाण यांनी केली आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा कहर सुरू झाला होता. त्यावेळेस केंद्र सरकारने अचानक लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यावेळेस केंद्र सरकारकडून गोरगरीब जनतेला दिलासा देण्यालायक कोणतीही कृती केली नव्हती. तरीही महाविकास आघाडीकडून परराज्यातील जनतेसह सर्वच नागरिक वाऱ्यावर जाणार नाहीत, याची काळजी घेतली होती. आता नव्याने लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. लाॅकडाऊनमुळे गोरगरीब जनतेसमोर उपजिवीकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. परिणामी जनतेमधून संताप व्यक्त होण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, लाॅकडाऊनची गरज आहेच; पण, सामान्य माणूस भुकेने मरू नये याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. रोजगार नसल्याने मुलांचे शैक्षणिक शुल्क अदा करणे पालकांना शक्य होणारे नाही. त्यामुळेच केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला भरघोस अर्थ साह्य करावे अन् महाराष्ट्र सरकार, ठामपा यांनी जनतेला मोफत अन्नधान्याचा पुरवठा करावा तसेच शैक्षणिक शुल्क माफ करावेत, अशी मागणी शानू पठाण यांनी केली आहे

Post a Comment