Header AD

शहरातील रुग्णालयांच्या सुरक्षेते संदर्भात महापालिका, टास्क फोर्स आणि खाजगी डॉक्टर्स यांची बैठक


खाजगी रुग्णालयांनी फायर, ऑक्सिजन व विद्युत यंत्रणेचे ऑडिट करून समन्वयाने काम करण्याचे आयुक्तांचे निर्देश...


ठाणे , प्रतिनिधी  ;  कोविड-१९ उपचारादरम्यान कोणतीही दुर्घटना होवू नये यासाठी सर्व रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन व विद्युत यंत्रणेचे तातडीने ऑडिट करण्याचे आदेश देतानाच सध्यस्थितीत कोविड-१९ उपचारासाठी जी पद्धत निश्चित करण्यात आली आहे तिचा अवलंब करावा असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले.


           रुग्णालयात कोणत्याही कारणास्तव दुर्घटना घडू नये यासाठी करावयाच्या उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आज शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (1) गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे तसेच टास्क फोर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.


      शहरातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ऑक्सिजन पुरवठयासाठी महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलवर तसेच खाजगी हॉस्पिटवर देखील मोठया प्रमाणावर ताण पडत आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना योग्य ते उपचार देण्यासोबतच हॉस्पिटलचे संपूर्ण व्यवस्थापन सुयोग्य स्थितीत असणे अत्यंत गरजेचे आहे.


       खासगी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारे दुर्घटना घडू नये तसेच हॉस्पिटलमधील अग्निशमन सुरक्षा, ऑक्सीजन तसेच विद्युत पुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी करण्यासाठी हॉस्पिटल व्यवस्थापनाने एका व्यक्तीची नियुक्त करण्यात यावी तसेच ऑक्सिजन बाबतच्या अडचणीसाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व डॉक्टरांना दिले.  


          कोविड- १९ मुळे रुग्णायातील विद्युत यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला असून सरकारी तसेच खाजगी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या तसेच त्यांच्या नातलगांचा वावर असतो अशावेळेस सदर ठिकाणी कोणत्याही कारणाने अपघात घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तीय हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे रुग्णालयात विद्युत यंत्रणेचे निरीक्षण करून त्याचे निराकारण केल्यास विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे होणारे अपघात टाळणे शक्य होणार आहे. 


         यासाठी विद्युत संच मांडण्याचे निरीक्षण करण्यासाठी मानक कार्य प्रक्रिया व सूची तयार करण्यात येवून सर्व रुग्णालयातील विद्युत मांडणीचे निरीक्षण करण्यात येणार आहे. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन साठा, ऑक्सिजन वितरण प्रणाली अद्ययावत ठेवण्यासोबतच ऑक्सिजन संदर्भांत काही अडचणी असल्यास महापालिकेशी समन्वय साधण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिले.


    यावेळी रुग्णालयात आवश्यकतेनुसार सर्व ठिकाणी पुरेशा प्रमाणात आग प्रतिबंधक उपकरणे उपलब्ध असल्याची खात्री करून घेणे, आग प्रतिबंधक उपकरणे व कार्यप्रणाली कार्यान्वित असण्याबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले. दरम्यान हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाबाबत त्याच्या नातेवाईकांना योग्य ती माहिती देणे, त्यांच्याशी सुसंवाद साधत रुग्णांकडून योग्य तीच बिलाची रक्कम वसूल करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 


चौकट : ऑक्सिजनबाबत अलर्ट राहण्याच्या सूचना


सध्यस्थितीत ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात असून आवश्यतेनुसार त्याचा साठा करून ऑक्सिजनचे सुयोग्य वितरण करावे. रात्री-अपरात्री रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होवू नये यासाठी ऑक्सिजन साठा संपण्याअगोदरच आगाऊ कळविण्यात यावे. त्यानुसार तातडीची उपाययोजना करणे सोयीचे ठरणार असून ऑक्सिजन बाबत अलर्ट राहण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या.

शहरातील रुग्णालयांच्या सुरक्षेते संदर्भात महापालिका, टास्क फोर्स आणि खाजगी डॉक्टर्स यांची बैठक शहरातील रुग्णालयांच्या सुरक्षेते संदर्भात महापालिका, टास्क फोर्स आणि खाजगी डॉक्टर्स यांची बैठक Reviewed by News1 Marathi on April 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads