कल्याण मधील दिव्या जैनचा सीए परीक्षेत भारतात ३३ वा क्रमांक नगरसेवक सचिन खेमा यांनी केला सन्मान
कल्याण , कुणाल म्हात्रे : नुकताच सी ए परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत कल्याण मधील दिव्या दिनेश जैन या विद्यार्थिनीचा संपूर्ण भारतात ३३ वा क्रमांक आला आहे. दिव्याच्या या यशा बद्दल भाजपा नगरसेवक सचिन खेमा यांनी तिचा शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला आहे.
जानेवारी महिन्यात झालेल्या सी ए च्या परीक्षेत कल्याण पश्चिमेतील जोशी बाग येथे राहणारी दिव्या जैन हिचा ३३ वा क्रमांक आला असून आपल्या या यशात आपले कुटुंबीय, शिक्षक आणि मित्र परिवार यांचा सहभाग असल्याचे तिने सांगितले. तसेच आपल्या या यशाबद्दल नगरसेवक सचिन खेमा यांनी सन्मान केल्या बद्दल त्यांचे आभार मानले.
काही कठीण परिक्षांपैकी एक असणारी सी ए ची परीक्षा उत्तीर्ण होणे हे मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत कल्याण मधील दिव्या जैन हिने केवळ उत्तीर्ण न होता संपूर्ण भारतात ३३ वा क्रमांक मिळवला हे कल्याण डोंबिवलीकरांसाठी अभिमानाची गोष्ट असून तिला प्रोत्साहन देण्यासाठी तिचा छोटा सन्मान केला आहे. दिव्याच्या या यशातून इतर विद्यार्थ्यांनी देखील प्रेरणा घेऊन असेच यश प्राप्त करून कल्याणचे नाव लौकिक करावे अशी प्रतिक्रिया यावेळी नगरसेवक सचिन खेमा यांनी दिली.

Post a Comment