महाराष्ट्रात होणा-या सर्व प्रस्तावित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने घ्याव्यात..
ठाणे , प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर या पाच ( ५ ) महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणूका या एकसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रभाग रचना करण्याचे सुधारीत आदेश दिले आहेत. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत अनेक त्रूटी होत्या आणि त्या त्रुटीचे निरसन करण्याच्या अनुषंगाने आलेल्या या आदेशाचे राजकिय पक्ष आणि मतदारांनी स्वागत केले आहे, पण महाराष्ट्रातील ज्या स्वराज्य संस्थांच्या मुदत संपल्यात तेथील निवडणूका कोरोना या वैश्विक महामारीमुळे राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या आहेत. सदर निवडणूका एकसदस्यीय पद्धतीने न घेता बहुसदस्यीय पद्धतीने घ्याव्यात यासाठी काही प्रस्थापित पक्ष आग्रही असून आयोगाकडे तशी मागणी करत आहेत.
नगरराज बिलाप्रमाणे जनतेचे योग्य वा संपूर्णतः प्रतिनिधीत्व होण्यासाठी एकसदस्यीय प्रभाग रचनेने निवडणूका घेणे आवश्यक आहे. सदर एकसदस्यीय प्रभाग पद्धतीत जनतेचे खरे प्रतिनिधी निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे, अन्यथा प्रस्थापित धनवान राजकीय पक्ष पैशाच्या जोरावर या लोकशाही प्रक्रियेची पायमल्ली करतील आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय न देता सर्व व्यवस्था (यंत्रणा) आपल्याच ताब्यात ठेवुन सार्वजनिक पैशाच्या सहाय्याने वैयक्तिक स्वार्थ व कुटूंबाची सत्ता कायम करतील. त्यामुळे या प्रस्थापित पक्षांच्या मागणीकडे दुर्लक्ष करावे आणि ठाणे महापालिकेसह सर्व स्थानिक संस्थाच्या आगामी निवडणुका एक-सदस्यीय प्रभाग पद्धतीने घ्याव्यात अशी मागणी एका निवेदनाद्वारे ठाण्यातील पक्ष-संघटनांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
आम आदमी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, स्वराज इंडिया, जनता दल-सेक्युलर या पक्षांनी व ठाणे मतदाता जागरण अभियान या संघटनेने तसे निवेदन देऊन कोकण विभागीय आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी आणि राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे केली आहे. ठाणे शहरात 2022 साली होणार्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत देखील एक-सदस्यीय प्रभाग पद्धतीने व्हाव्यात, अशी मागणी करणारे ठाणे जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष सतीश सलूजा, शेतकरी कामगार पक्षाचे शहर अध्यक्ष अनिल म्हात्रे, स्वराज इंडिया ठाणे सहर अध्यक्ष सुब्रतो भट्टाचार्य आणि जनता दल (से.) चे ठाणे जिल्हा अध्यक्ष धनाजी सुरोसे यांनी त्यांना निवेदन दिले आहे.

Post a Comment