कल्याण , कुणाल म्हात्रे : झपाट्याने फैलावत असलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे कांही ठिकाणी ग्राहकांच्या मीटर रीडिंगचे काम बाधित होण्याची शक्यता आहे. अशा ग्राहकांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातून त्यांचे मीटर रीडिंग स्वत:हून महावितरणला पाठवण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नुकतेच केले आहे. त्यानुसार कल्याण परिमंडलात रीडिंग बाधित होऊ शकणाऱ्या ग्राहकांना माहिती देऊन त्यांच्याकडून अचूक वीजबिलासाठी मीटर रीडिंग मागवून घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
महावितरणकडे मोबाईल क्रमांकांची नोंदणी करणाऱ्या वीज ग्राहकांना मीटर रिडींग घेतल्याची तारीख, वेळ, सध्याचे एकूण युनिट व वापरलेले विजेचे युनिट, बिलाची रक्कम व बिल भरण्याची अंतिम मुदत, नियोजित देखभाल व दुरुस्ती तसेच तांत्रिक बिघाडामुळे खंडित झालेला वीजपुरवठा व वीजपुरवठा सुरळीत होण्याचा संभाव्य कालावधी, थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्याची पूर्वसूचना अशी सर्व प्रकारची माहिती 'एसएमएस'द्वारे पाठविण्यात येते. याशिवाय एखाद्या कारणास्तव मीटरचे रिडींग घेणे अशक्य असल्यास ग्राहकानेच मीटर रिडींगचा फोटो काढून ॲपद्वारे महावितरणला पाठविण्याबाबत 'एसएमएस'द्वारे सुचित करण्यात येते.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावात महावितरणची ही सुविधा महत्वपूर्ण असून कल्याण परिमंडलात २२ लाख ९० हजार (सुमारे ८८ टक्के) ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावर ही सुविधा देण्यात येते. परिमंडलातील उर्वरित १२ टक्के ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद करावी तसेच नोंदणीकृत मोबाईल बंद, चुकीचा असेल किंवा क्रमांक बदलला असल्यास नवीन क्रमांक अद्ययावत करावेत, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.
मार्च-२०२१ या महिन्यात कल्याण परिमंडलातील १२ लाख २७ हजार ६१९ लघुदाब ग्राहकांनी त्यांच्या २५९ कोटी ७९ लाख रुपयांच्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करुन महावितरणला सहकार्य केले आहे. यासाठी ग्राहकांनी महावितरणचे मोबाईल ॲप, संकेतस्थळ, विविध पेमेंट ॲप आदींचा उपयोग केला आहे. सध्याच्या कठीण प्रसंगी सुरक्षेच्या कारणास्तव गर्दी टाळावी व विविध डिजिटल माध्यमांचा उपयोग करून वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
Post a Comment