Header AD

ब्रह्मांड कट्ट्यावर रंगली सदाबहार शम्मी कपूर व देव आनंद यांच्या गीतांची महफिल !
ठाणे , प्रतिनिधी  ;  नकारात्मक वातावरणात देखील आपल्या रसिक प्रेक्षकांना सकारात्मकता व आनंदाचे काही क्षण देण्यासाठी ब्रह्मांड कट्टा कायम झटत असतो. संपूर्ण जग आज कोरोनानामक बेड्यांमध्ये अडकलेले असून केवळ रस्त्यांवरच नव्हे तर मनमनांतदेखील भयाण शांतता आहे. अशा परिस्थितित रसिकांना तणावमुक्त  करण्यासाठी रविवार दिनांक १८ एप्रिल रोजी 'ओमकार संगीत अकादमी' व 'मेंटेनंस फ्री सोसायटी' यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रम्हांड कट्ट्याने ऑनलाईन माध्यमातून  *'सदाबहार शम्मी कपूर व देव आनंद'* हा सुरेल गीतांचा कार्यक्रम सादर केला.


             १५ एप्रिल हा दिवस जागतिक कला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ब्रह्मांड कट्टा अंतर्गत कलासंस्कार या संस्थेने बालगोपाळांसाठी ऑनलाईन चित्रकला व स्तोत्र पठण स्पर्धांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक श्री.राजेश जाधव यांनी या स्पर्धांचे निकाल जाहीर करत स्पर्धकांचे अभिनंदन केले. याच दिवशी कलासंस्कार संस्थेचा सांस्कृतिक कार्यक्रम योजला होता. परंतु कार्यक्रमात लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरीकांचा सहभाग असल्याने कोरोनाकालीन सुरक्षेच्या दृष्टीने कार्यक्रम रद्द करण्यात आला. परंतु रसिकांची निराशा होऊ नये याखातर श्री. योगेश राजाध्यक्ष व श्री. रविंद्र देसाई या गायक जोडीने केवळ दोन दिवसात शम्मी कपूर व देव आनंद यांच्या गीतांचा कार्यक्रम उभा करुन ब्रह्मांड कट्ट्याचा मनोरंजनाचा वारसा चालू ठेवला.


                 गायक योगेश राजाध्यक्ष यांनी गायलेल्या ' किसी ना किसी से' या शम्मी कपूर यांच्या गीताने  कार्यक्रमाची बहारदार सुरुवात झाली. त्यानंतर योगेश यांनी तरुणाईलाही लाजवेल अशा दिलखेचक अदाकारीत एक से बढकर एक गीतांचा खजाना रसिकांसमोर उलगडला. रोमारोमात चैतन्य फुलवणारी 'माना जनाब ने', ' आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे' अशी अनेक जोशपूर्ण गीते योगेश यांनी सादर केली. 'तुमने किसी की जान को', 'कही आज किसी से', 'ख्वाब हो तुम' या योगेश यांच्या कर्णमधुर गीतांनी रसिकांच्या ह्रृदयाची स्पंदने वाढविली.


                योगेश यांनी गायलेले 'मै जिंदगी का साथ निभाता चला गया' या गीताने प्रेक्षकांना आजच्या नैराश्यजनक जीवनाकडे पहाण्याचा जणू एक नवा दृष्टीकोन दिला. रंगतदार    झालेल्या या वातावरणाला आपल्या सुरांचे कोंदण चढविले ते शास्त्रीय गायनात हातखंडा असलेल्या श्री. रविंद्र देसाई यांनी. 'तुमने मुझे देखा' या  गीताने रविंद्र याचा सुरांप्रति असलेला ध्यास नक्कीच रसिकांपर्यंत पोहोचवला. त्यानंतर ' तेरे मेरे सपने', 'तु कहा ये बता' या सुरेल गीतांनी रसिकांच्या मनाला भुरळ पाडली.


               रविंद्र यांनी ' है अपना दिल', 'तुमसे अच्छा कौन है' या गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. रविंद्र यांनी घातलेल्या 'अभी ना जाओ छोडकर' या आर्त सादेने तर रसिकांच्या ह्रृदयात हात घातला. कार्यक्रमाच्या अंतीम टप्प्यात  'अॅन इव्हनिंग इन पॅरिस' हे गीत गाऊन  रविंद्र यांनी प्रेक्षकांना घरबसल्या पॅरिसदर्शन घडविले. कार्यक्रमाचे अतिशय संयमित व ओघवत्या भाषेत सौ. अर्चना देसाई यांनी निवेदन केले. 


              प्रत्येक गाण्याविषयी त्यांनी परिपूर्ण अशी माहिती श्रोत्यांना दिली. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम केवळ कर्णमधुरच नव्हे तर माहितीपूर्ण देखील झाला. कार्यक्रमाच्या शेवटी ब्रहमांड कट्ट्याचे अध्यक्ष श्री. महेश जोशी यांनी प्रतिकुल परिस्थितीतदेखील वाखाणण्याजोगा कार्यक्रम प्रेक्षकांना सादर केल्याबद्द्ल गायक व निवेदक यांचे आभार मानले व जागेवर अक्षरशः खिळवून ठेवलेल्या या सदाबहार कार्यक्रमाचा समारोप केला.
ब्रह्मांड कट्ट्यावर रंगली सदाबहार शम्मी कपूर व देव आनंद यांच्या गीतांची महफिल ! ब्रह्मांड कट्ट्यावर रंगली सदाबहार शम्मी कपूर व देव आनंद यांच्या गीतांची महफिल ! Reviewed by News1 Marathi on April 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads