मीटर एजन्सी कडून रिक्षा चालकांची लूटमार प्रहार संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा
ठाणे (प्रतिनिधी) - राज्य शासनाने रिक्षा भाड्यांमध्ये वाढ केली आहे. या भाडेवाढीनंतर रिक्षांच्या मीटरमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. ही सुधारणा करुन घेण्यासाठी ज्या एजन्सी नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्या एजन्सींकडून रिक्षाचालकांची लूटमार केली जात आहे, अशी तक्रार प्रादेशिक परिवहन अधिकार्यांकडे प्रहार संघटनेने केली आहे.
परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी रिक्षाभाडेवाढीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालकांनी मीटर पासिंगची प्रक्रिया सुरु केली आहे. या पासिंगसाठी शासनाने 700 रुपयांची दरनिश्चिती केली आहे. मात्र, ठाण्यातील सुपर, स्टॅईड, सनसुई व दिघे हया मिटर एजन्सीकडून 1,000 रुपयांची मागणी रिक्षाचालकांकडे केली जात आहे.
ही रिक्षाचालकांची लूटमार असून ठाण्यातील सर्व रिक्षा संघटना आणि शासनाने नोंदणीकृत केलेल्या मीटर एजन्सी यांची संयुक्त बैठक बोलावून यावर तोडगा काढावा; अन्यथा, रिक्षा चालकांच्या न्याय हक्कांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड आणि प्रहार जनशक्ती रिक्षा-टॅक्सी युनियनचे अध्यक्ष दयानंद गायकवाड यांनी दिला आहे.

Post a Comment