Header AD

स्थायी समितीच्या अर्थसंकल्पीय बैठकीत शानू पठाण यांची अभ्यासपूर्ण टोलेबाजी


■पाचशे फुटांच्या घरांना करमाफी हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासह पवारसाहेब,  उद्धवसाहेब , आव्हाड साहेब, शिंदेसाहेब आणि आपले सर्वांचे स्वप्न...


ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महानगर पालिकेच्या मंगळवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत विरोधी पक्षनेते तथा स्थायी समिती सदस्य अश्रफ शानू पठाण यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण टोलेबाजी केली. मालमत्ता कर, जाहिरात कर, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा,  विकासकांचे प्रश्न,  परिवहन आदी विषयांवर त्यांनी विवेचन केले. यावेळी त्यांनी गोरगरिबांना करमाफी देण्याबाबत आग्रही भूमिका मांडली.पाचशे फुटांच्या घरांना करमाफी हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासह पवारसाहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब,  गृहनिर्माण मंत्री डाॅ जितेंद्र  आव्हाड साहेब, पालकमंत्री एकनाथ  शिंदेसाहेब आणि आपले सर्वांचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपलीच आहे,  असेही शानू पठाण यांनी नमूद केले. 

प्रशासनातर्फे मांडण्यात आलेल्या अंदाजपत्रकावर आज स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी शानू पठाण बोलत होते. 


*पाचशे चौरस फुटांच्या घरांना करमाफी देऊन बाळासाहेब,  पवारसाहेब, आव्हाडसाहेब,  शिंदेसाहे ब आणि आपले स्वप्न पूर्ण करावे*


पाचशे चौरस फुटांच्या घरांना करमाफीबाबत शानू पठाण यांनी आग्रही भूमिका मांडली. ते म्हणाले,  ज्या पालिकेचा अर्थसंकल्प चार हजार कोटींच्या घरात होता. त्या ठामपाचा अर्थसंकल्प कोविडमुळे 2700 ते 2800 कोटींवर आला आहे. ठामपाने मालमत्ता करातून 693 कोटींचे उत्पन्न गृहित धरले आहे.  हे उत्पन्न झोपडीधारकांना आणि पाचशे फुटांच्या घरात राहणार्यांकडून अभिप्रेत आहे. पाचशे फुटांच्या घरांना करमाफी हे बाळासाहेब ठाकरे यांनी पाचशे फुटांच्या घरांना करमाफी देण्याचे स्वप्न पाहिले होते.   पवारसाहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र  आव्हाड साहेब, पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचेही तेच स्वप्न आहे.  आपले सर्वांचे स्वप्नही तेच आहे. ते पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे. 

 

ठाणे शहरात असलेल्या मोठ मोठ्या माॅल्स, हॉटेल्स, ओपन बँक्वेट   हाॅल्स याबाबत काय? या माॅलमध्ये असणार्या गाळ्यांमधून लाखोंचे भाडे आकारुन मालक गब्बर होत आहेत. तर माॅलच्या पॅसेजमध्ये, पार्किंगमध्ये गाळे उभारून त्यावर मालकांची कमाई सुरू आहे. त्या गाळ्यांची शहर विकास आणि कर विभागाकडे नोंदी नाहीत. *एखाद्या गरीब मराठी माणसाने माॅलच्या बाहेर वडापावची गाडी लावली तर त्याच्यावर कारवाई केली जाते. पण, पॅसेज- पार्किंगमधील गाळ्यांसंदर्भात सदस्यांनी सभागृहात विषय काढले तर त्यास मोठमोठ्या लोकांचे फोन येतात*   म्हणूनच अशा गाळ्यांची नोंद करून  व्यावसायिक कर आकारणी केली  पाहिजे.  दुसरीकडे येऊरसह मुंब्रा भागात ओपन बँक्वेट हाॅल आणि होटेल उभारण्यात आले आहेत. त्याचीही अनेक वर्षे कर निर्धारण खात्याकडे  नोंद नाही. अशा हॉटेल्स आणि बँक्वेट हाॅलवर कर व्यावसायिक  आकारणी केली तर उत्पन्नात वाढ होईलच; शिवाय पाचशे फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी देताना पालिकेला आर्थिक भारही सोसावा लागणार नाही.      


 यासाठी गृहनिर्माण मंत्री डाॅ जितेंद्र आव्हाड , पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा सल्ला घेऊन ही करवाढ केली तर गोरगरीब जनतेला जे पाचशे फुटांच्या आतील घरात राहतात. त्यांना करमाफी देणे शक्य होईल. मुंबई पालिकेने त्या दृष्टीकोनातून सुरूवात केली आहे.  त्यांनी नगरविकास खात्याला अहवाल पाठवला आहे.  मात्र, आपण सुरुवातही केलेली नाही. एकीकडे गोरगरीब ठाणेकर लाॅकडाऊन काळातील सहा महिन्यांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी माफ होईल, अशी आशा बाळगून असतानाच कर वसुलीसाठी त्यांच्या घरांना नोटीस चिकटवण्याचे काम सुरू असून  सिल ठोकण्याचीही प्रक्रिया केली जात आहे. पाचशे फुटांच्या आतील घरांना करमाफी तर दूरच उलटपक्षी कर वसुलीसाठी कारवाई केली जात आहे.    आपल्याकडून झोपडीधारकांच्या,   जुन्या ठाणेकरांच्या काही अपेक्षा आहेत. त्या आपण पूर्ण करण्यासाठी ही करमाफी दिलीच पाहिजे. 


जाहिरात करात वाढ करावी

जाहिरात करातून 10 कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. पण, आपणही मुंबई पालिकेने केलेल्या बदलांप्रमाणे कर आकारणीत बदल केले. तर हे उत्पन्न 50 कोटींवर जाईल. जाहिरातीच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार होत आहे.  त्यासाठी श्वेत पत्रिका काढणे गरजेचे आहे. आज लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी सुविधा निर्माण करून काय साध्य होत आहे.  त्यासाठी आपण आता जाहिरात करात वाढ करावी, अशी सूचना शानू पठाण यांनी केली. 


शाई धरण झालेच पाहिजे

कोट्यवधी रुपयांचा खर्च करून आपण पाणी मीटर बसविले आहेत. पण, हे मीटर बसवून काय फायदा झाला आहे.  आजही दिवा, मुंब्रा,कळवा भागात पाणीच येत नाही. आपण हे ध्यानात घेतले पाहिजे की,  भविष्यात पाण्यासाठी युद्ध होणार आहेत.   तरीही, आजवर धरणाच्या बाबतीत ठामपाने निर्णय घेतलेला नाही. सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार विकास कामांना प्राधान्य देत आहे. अशावेळी आपण आपले नेते  गृहनिर्माण मंत्री डाॅ जितेंद्र आव्हाड  , पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आपण सर्व जेष्ठ सदस्य अजीतदादा यांची भेट घेतली तर धरणाचा प्रश्न सुटण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही.  हे काम कोणालाही द्या, त्याचे श्रेय कोणीही घ्या. पण आधी धरण बांधा. जर आपण आज धरण बांधले तर येणार्या पुढील पिढ्या आपणाला ध्यानात ठेवतील.  आजही मुंब्रा, दिवा भागातील लोकांना विहिर आणि बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे. ठाणे स्मार्ट सिटी आहे ना? मग हे काय? स्मार्ट सिटीच्या नावाखाली नवीन ठाणे आपण करीत आहोत,  नवीन ठाणे झालेच पाहिजे,  यात दुमत नाही,  पण, जुन्या ठाण्याला; जुन्या ठाण्यातील सामान्य, गोरगरीब ठाणेकरांना  जर आपणाला पाण्यासारखी मूलभूत सुविधा देता येत नसेल तर कसे चालेल? म्हणून आपण आता शाई धरणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. त्यासाठी अर्थसंकल्पात आताच तरतूद करावी, अशी मागणीही शानू पठाण यांनी केली. 


■विकासकांमध्ये विश्वास निर्माण करावा

सध्याच्या स्थितीत सर्व विकासकांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. या विकासकांमुळे ठामपाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.  म्हणून त्यांची बैठक बोलावून नवीन प्रकल्प ठाण्यात आणणे आणि त्यानंतर उत्पन्न वाढवणे महत्त्वाचे आहे, अशी सूचना शानू पठाण यांनी केली. 

डम्पींगचा प्रश्न सोडवा

गेल्या अनेक वर्षापासून डंम्पींगचा विषय प्रलंबित आहे.  एवढ्या वर्षात आपण एक भूखंड आरक्षित ठेऊ शकलेलो नाही. हे दुर्दैव आहे. दिव्यातील डंम्पींगचा त्रास काय आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर सदस्यांनी चार तास या परिसरात बसून दाखवावे, येथील लोकांना कोरोनापेक्षा कचरा आणि धुराची अधिक भीती वाटत आहे.  या नागरिकांना आपण मरणाच्या दारात सोडले आहे. त्यामुळे प्रशासन आणि आपण एकत्र येऊन डम्पींगचा निर्णय घेतला पाहिजे, असेही शानू पठाण यांनी सांगितले. 

■हवं तर माझी गाडी रद्द करा; पण परिवहन सभापतींना सुविधा पुरवा


ठाणे पालिकेच्या परिवहन सेवेची अवस्था अत्यंत बिकट आहे. परिवहन सेवेला उर्जितावस्था देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणे, इलेक्ट्रॉनिक्स बसगाड्या, कार्यालयातील असुविधा आदींबाबत विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी भूमिका मांडली. 


परिवहन कार्यालयाकडे छोटे वाहन नसल्याने कागदपत्रांची ने आण करण्यासाठी वेळ जात आहे. त्यामुळे परिवहन कार्यालयासाठी रिक्षाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. परिवहन सभापतींच्या कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. विलास जोशीकाका हे आपणाला पित्यासमान आहेत. 


त्यांच्या दालनात होणारे लिकेज आणि त्यांच्या दालनाची दुरवस्था पाहून माझे मन भरून आले. म्हणूनच    एकवेळ पुढील स्थायी समिती बैठकीत येणारा आपल्या गाडीचा विषय रद्द करा. पण, परिवहन सभापती विलास जोशी यांच्या दालनाचे नूतनीकरण करून त्यांची या त्रासातून सुटका करून त्यांना चांगले-स्वच्छ दालन तयार करून द्यावे; परिवहन कार्यालयाला एक रिक्षा द्या, अशी मागणी शानू पठाण यांनी केली.

दरम्यान,  मुंब्रा येथील रूग्णालय, रस्तारूंदीकरण आणि इतर विकासकामांसाठी या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची मागणीही  शानू पठाण यांनी केली.

स्थायी समितीच्या अर्थसंकल्पीय बैठकीत शानू पठाण यांची अभ्यासपूर्ण टोलेबाजी स्थायी समितीच्या अर्थसंकल्पीय बैठकीत शानू पठाण यांची अभ्यासपूर्ण टोलेबाजी Reviewed by News1 Marathi on March 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads