कल्याण , कुणाल म्हात्रे : शिक्षक हा समाजाचा कणा असून त्यांनी समाजाभिमुख काम करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये टिकून ठेवले पाहिजे. सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. अशाच पद्धतीचं कार्य अजय पाटील हे शिक्षक सातत्याने करत आहेत. म्हणूनच त्यांना डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे असे उद्गार डॉक्टर रवींद्र जाधव यांनी या प्रसंगी काढले. कल्याणातील नावाजलेली डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्ट व डॉक्टर मित्र यूट्यूब चँनलच्या माध्यमातून राज्यभरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन उचित असा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे कार्यरत असणारे पदवीधर शिक्षक अजय लिंबाजी पाटील यांना राज्यस्तरीय डॉक्टर मित्र आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. रवींद्र जाधव, डॉ. सुरेखा जाधव व संजय शिंगारे अध्यक्ष ह्युमन राईट यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
अजय पाटील हे गेले बत्तीस वर्ष शिक्षकी पेशात सेवा करत असून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. शालेय विद्यार्थ्यांची नाट्य, लघुपट विविध प्रकारचे उपक्रम अशा माध्यमातून शैक्षणिक प्रगती करत आहेत. अजय पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला असून विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. अजय पाटील यांनी तयार केलेल्या लघुपटांना अमेरिका, ब्राझील, इटली, क्रोएशिया तसेच यांच्या NCERT दिल्ली येथे पुरस्कार मिळाले आहेत. अजय पाटील हे विद्यार्थ्यांमध्ये आवडते शिक्षक असून त्यांनी नियमितपणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा ध्यास धरला आहे.
कोवीडच्या काळातही वर्क फ्रॉम होम सुरू असतानाही त्यांनी शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू दिले नाही. लक्ष्मी चित्र या यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून त्यांनी १२७ व्हिडिओ तयार करून शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. अशा बहुआयामी शिक्षकाला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post a Comment