बॅडमिंटन कोर्टाच्या जागेत भंगार माफियांचा कब्जा पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण स्टेशन परिसरातील ओक बागेनजीक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने बॅडमिंटन कोर्ट उभारण्याचे काम सुरु असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या जागेत भंगार माफियांनी कब्जा केला आहे. त्याकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
स्टेशन परिसरातील महापालिकेच्या बॅडमिंटन कोर्टाच्या जागेत असा कब्जा भंगार माफिया करीत असतील महापालिकेच्या अन्य मालमत्तांची काय अवस्था असू शकते याचा विचार केलेलाच बरा. निर्माणाधिन असलेल्या बॅडमिंटन कोर्टाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र त्यात भंगार माफियांनी घुसखोरी केली आहे. तसेच वीजेचे साहित्यही त्याठिकाणी ठेवले आहे.
शिवसेना नगरसेवक आणि माजी महापौर रमेश जाधव यांनी सांगितले की, ही जागा केडीएमसीची मालमत्ता आहे. प्रशासनाने तातडीने भंगार माफीयांच्या विरोधात कारवाई करुन ती जागा खाली केली पाहिजे. या संदर्भात जाधव लवकर प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहेत. तसेच भंगार माफियांशी अधिकारी वर्गाचे साटेलोटे आहे का त्याची चौकशी आयुक्तांनी करुन संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी जाधव यांच्याकडून करण्यात येणार आहे.

Post a Comment