उल्हासनदी प्रदुषणा प्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
◆जागरूक नागरिक मंचचे खडकपाडा पोलिसांना निवेदन....
कल्याण , कुणाल म्हात्रे : उल्हासनदी मधील वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या नाले आणि कंपन्यांमधील रासायनिक पाण्यामुळे जलजीवन त्याचप्रमाणे मानवी जीवनावर देखील परिणाम होत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी माजी नगरसेवक नितीन निकम यांनी नदी पात्रात आंदोलन सुरु केले असतानाच या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी कल्याण मधील जागरूक नागरिक मंचच्या वतीने या नदीच्या प्रदुषणासाठी जवाबदार असणार्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी खडकपाडा पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मोहोने गाव येथील तसेच गाळेगाव येथील जलनिःसारण नाल्याचे तसेच अनेक ठिकाणी शहरी ड्रेनेजचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता उल्हास नदीमध्ये सोडले जात आहे. हा सर्व प्रकार मानवी आयुष्याशी खेळ करण्याचा आहे. अनेकवेळा महापालिका आणी संबधीत यंत्रणा निवेदनाना दाद देत नाहीत. आता हा सर्व प्रकार हाताबाहेर चालला असून संबंधितांना उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांनी आदेश पारित करूनही त्यावर कोणतीही कारवाई झाल्याचे दिसुन येत नसल्याने खडकपाडा पोलीस स्टेशनं अंतर्गत हा सर्व प्रकार होत असल्याने संबंधितां विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असल्याची माहिती जागरूक नागरिक मंचचे श्रीनिवास घाणेकर यांनी दिली आहे.

Post a Comment