ठामपा कडून मुंब्रा- कौसा वासियांची करवसुलीत लूटमार
ठाणे , प्रतिनिधी : - करवसुलीचा टक्का वाढावा , यासाठी ठामपाने शास्तीमध्ये शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करताना मुंब्रा-कौसावासियांना सापत्न वागणूक दिली जात आहे. ठाणे शहरात जेवढी सूट दिली जात आहे. त्यापेक्षा कमी सूट देऊन करदात्यांची लूटमार केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. ही बाब विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांच्या ध्यानात येताच त्यांनी करवसुली केंद्रात जाऊन अधिकार्यांना फैलावर घेतले.
ठामपाने शास्तीमध्ये शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सूट देण्यासाठी ठामपा मुख्यालयातून विविध कर संकलन केंद्रांमध्ये रक्कम आणि द्यावयाची सूट यांचा तक्ता पाठवला आहे. मात्र, मुंब्रा- कौसावासियांकडून करभरणा केला जात असताना हा तक्ता बाजूला सारून चक्क अंदाजे सूट दिली जात आहे. ज्या लोकांना पाणी किंवा मालमत्ता करापोटी 75000 रूपयांचे देयके पाठविण्यात आली आहेत. त्यांच्याकडून 64000 रूपये वसुल करून 9 हजारांची सूट देण्यात आली. तर याच देयकावर ठाण्यात सुमारे 40000 हजारांची सूट देऊन 36000 रूपये आकारण्यात आले. अशा पद्धतीने अनेक करदात्यांना गंडविण्यात आले आहे. या संदर्भात तक्रारी आल्यानंतर शानू पठाण यांनी थेट कर संकलन केंद्र गाठून अधिकारी आणि लिपीकांना चांगलेच फैलावर घेतले.
या प्रकरणात जाणीवपूर्वक करदात्यांची लूटमार झालेली आहे. जर मुख्य करनिर्धारकांनी सूट आणि देयके यांचा तक्ता दिलेला असतानाही अशी लूटमार झाली असेल तर हा मोठा कर घोटाळा असू शकतो. त्यामुळे या संदर्भात आपण बैठक बोलावून सर्व प्रकाराची चौकशी करण्याची सूचना आपण करणार आहोत, असे पठाण यांनी सांगितले.

Post a Comment