पालिकेच्या लेखी आश्वासना नंतर जागरूक नागरिकाचे उपोषण तिसऱ्या दिवशी मागे
◆रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या सुविधांबाबत तीन दिवसांपासून सुरु होते उपोषण....
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात मुलभूत सुविधांची वानवा असून रुग्णांना या सुविधा मिळाव्यात यासाठी कल्याण मधील जागरूक नागरिक सत्येंद्र त्रिपाठी गेल्या तीन दिवसांपासून पालिका मुख्यालयाच्या बाहेर आमरण उपोषणाला बसले होते. आज पालिकेच्या लेखी आश्वसनानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले असून येत्या महिनाभरात सर्व सुविधा रुग्णालयात सुरु होतील असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे बाई रूक्मिणीबाई रूग्णालय हे १२० बेड क्षमतेचे मोठे रुग्णालय कार्यरत असून यामध्ये बाहयरूग्ण विभाग तसेच आंतररूग्ण विभाग कार्यरत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अपघात विभाग, प्रसुती विभाग, अस्थिरोग विभाग, गरोदर माता तपासणी विभाग, प्रयोगशाळा तपासणी, क्षयरोग तपासणी, एड्स नियंत्रण विभाग, पोस्टमार्टम विभाग इत्यादी विभाग कार्यरत आहेत.
रूक्मिणीबाई रूग्णालयातील "मुलभूत व पायाभूत सुविधा सुधारणेकामी महानगरपालिकेमार्फत खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचे "पॅनल' तयार करण्यात आले आहे. या पॅनलवरील नियुक्त "स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ" यांच्या मदतीने प्रसुतीकरिता आलेल्या गरोदर महिलांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सेवा ७ फेब्रुवारी पासून रूग्णालयात सुरू करण्यात आलेली आहे. तसेच भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेता, सी टी.स्कॅन, एम.आर.आय., सोनोग्राफी इत्यादी सेवा सद्य:स्थितीत शास्त्रीनगर सामान्य रूग्णालय येथे सुरू आहेत. मात्र सदर सेवा बाई रूक्मिणीबाई रूग्णालय, कल्याण येथे देखिल सुरू करणे प्रशासनामार्फत विचाराधीन आहेत.
या व्यतिरिक्त रुक्मिणीबाई रूग्णालयाकरिता आवश्यक असलेले तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करून घेणेकामी सामान्य प्रशासन विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत असून पदभरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात रुक्मिणीबाई रूग्णालयातील सर्व मुलभुत व पायाभूत सुविधेमध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा झाल्याचे दिसून येणार असल्याचे लेखी आश्वासन पालिकेच्या वतीने साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी उपोषणकर्ते सत्येंद्र त्रिपाठी यांना दिले आहे.

Post a Comment