कल्याण डोंबिवलीत देखील वर्सोवा दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
◆मानवी वस्तीतील गॅस सिलेंडरच्या गोडाऊनमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर....
कल्याण , कुणाल म्हात्रे : गेल्या दोन दिवसांत मीरा रोड आणि वर्सोवा येथे झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटांमुळे काही जण जखमी तर नागरिकांच्या घरांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची पुनरावृत्ती कल्याण डोंबिवलीत देखील होण्याची शक्यता असून मानवी वस्तीतील गॅस सिलेंडरच्या गोडाऊन आणि उभ्या असणाऱ्या ट्रकमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कल्याण डोंबिवलीत २७ गॅस एजेन्सी असून याद्वारे एकूण ५ लाख ८७ हजार २५४ ग्राहकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो. या गॅस एजन्सीचे सिलेंडरचे गोडाऊन देखील शहरात असून काही एजन्सीचे गोडाऊन हे शहराबाहेर आहेत. कल्याण मध्ये आधारवाडी, उंबर्डे, खडकपाडा, भानूसागर, कल्याण पूर्वेतील हनुमान नगर, काटेमानिवली, नाना पावशे चौक, नांदिवली तलाव, डोंबिवली एमआयडीसी परिसर आदी ठिकाणी गॅस सिलेंडरचे गोडाऊन आहेत. यापैकी काही ठिकाणी गोडाऊन असून काही ठिकाणी सिलेंडरचे ट्रक रस्त्यावर उभे करून सिलेंडर पुरवठा केला जातो. यातील काही गोडाऊन हे मानवीवस्ती वसण्याच्या आधीचे आहेत. यामुळे याठिकाणी सिलेंडरचा स्फोट झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जे जुने गोडाऊन आहेत ते फायर इस्टेनग्यूशरचा वापर करतात तर नवीन गोडाऊनला परवानगी देतांना त्याठिकाणी स्थायी स्वरूपात अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे असून याठिकाणी मुबलक पाणी, इतर पंप सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे. तरच नवीन गोडाऊनला परवानगी देण्यात येत असल्याचे अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले.
Post a Comment