भिवंडीत आदिवासी वस्तीचे पाणी बंद करणाऱ्यांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल
भिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी तालुक्यातील खांबाळा ग्रामपंचायत क्षेत्रातील कुशिवली कातकरी पाडा या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबीयांनी खाजगी व्यक्तीकडून केल्या जाणाऱ्या वाढीव पाणीपट्टी वसुलीस विरोध केल्याने आदिवासी पाड्यातील नागरिकांचा व परिसरातील पाणी पुरवठा बंद केल्याने संबंधितांवर सोमवारी रात्री उशिरा पडघा पोलीस ठाण्यात अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे .
तालुक्यातील अंबाडी परिसरात अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या तानसा पाईपलाईन वरून नळ जोडणी करण्यात आली आहे. परंतु येथील संबंधित ग्रामपंचायत मार्फत पाणीपट्टी वसूल न करता त्यासाठी स्थानिक महिला मंडळ दरमहा ठराविक रक्कम वसूल करून ती परस्पर मुंबई महानगरपालिका पाणी बिल पोटी भरणा करीत असल्याचे सर्रास प्रकार या भागात होत असून ग्रामपंचायत क्षेत्रात काही खाजगी व्यक्ती दरमहा पाणीपट्टी वसुली करून ती स्वतःच्या फायद्या
साठी वापरुन मुंबई महानगरपालिकेची पाणीपट्टी थकीत ठेवत असल्याने अनेक स्थानिक आदिवासी वस्तीवर पाणी न मिळण्याची वेळ आली आहे.
भिवंडी तालुक्यातील खांबाळा ग्रामपंचायत हद्दीतील नळपाणी पुरवठा योजनेसाठी मुंबईला पाणीपुरावठा करणाऱ्या तानसा पाईप लाईन वरून नळ जोडणी करण्यात आली आहे. या पाणी वापराची पाणीपट्टी ग्रामपंचायत खात्यातून भरणे अभिप्रेत असताना गावातील गावदेवी पाणी कमिटीच्या महिलांकडून मासिक शंभर रुपये प्रत्येक घरातून वसूल करून ती पाणीपट्टी परस्पर मुंबई महापालिकेस भरणा केली जात असे.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉक डाऊन काळा पासून पाणीपट्टी थकीत असल्याने मुंबई महानगरपालिका प्रशासनानें पाणी पुरवठा खंडित करण्याची नोटीस खंबाळा ग्राम पंचायतीस दिली असता गावातील गावदेवी पाणी कमिटीच्या सदस्य महिलांनी या पैशाचा भरणा करण्यासाठी गावातून अतिरिक्त पैसे गोळा करण्यास सुरवात करीत आदिवासी कातकरी कुटुंबियांच्या प्रत्येक घरातून ५०० रुपये अधिक जमा करण्या बाबत तगादा लावला असता मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी कुटुंबीयांनी हे अधिकचे ५०० रुपये देण्यास नकार दिल्याने या वस्तीचे पाणी तब्बल तीन दिवस बंद ठेवण्यात आले .
या बाबत फिर्यादी शुभांगी विश्वास बगले यांनी पडघा पोलिसांकडे धाव घेऊन आम्ही दरमहा नियमित मासिक पाणीपट्टी देत असतानाही आदिवासी कातकरी समाजातील असल्याने जाणीवपूर्वक आमच्या परिसरातील पाणीपुरवठा खंडित केल्याची तक्रार दिली असता पडघा पोलिसांनी गावदेवी पाणी कमिटीच्या महिला जयश्री गजानन ठाकरे , जयश्री पाटील , आशा विठ्ठल मांजे , सविता मांजे , चिऊ पाटील या महिलां विरोधात अनुसूचित जाती व जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम १९८९ नुसार ३ ( १ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडीत आदिवासी वस्तीचे पाणी बंद करणाऱ्यांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल
Reviewed by News1 Marathi
on
February 09, 2021
Rating:

Post a Comment