गणपती बाप्पांनी केले वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन
कल्याण , कुणाल म्हात्रे : सध्या सर्वत्र माघी गणेशोत्सवाची धूम सुरु असून माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्तांच्या घरी आलेले गणराय चक्क कल्याणच्या रस्त्यावर अवतरल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांना गणपती बाप्पांनी गुलाबाचे फुल देत वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले.
रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक शाखा आणि आरएसपीच्या वतीने वाहन चालकांमध्ये वाहतुकी बाबत जनजागृती करण्यासाठी वाहतूक सुरक्षा नियमांवर आधारित महाविद्यालयीन कलापथकाने पथनाट्य सादर केले. कल्याण रेल्वे स्टेशन परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक आदी ठिकाणी हे पथनाट्य सादर करण्यात आले. वाहतूक नियमांबाबत चक्क बाल गणेशा अवतरले.
स्टेशन परिसरात पथनाट्याच्या आधारे वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी जय पाटील, आदित्य मालूजकर ह्या दोन लहान मुलांनी बाप्पाचा वेष परिधान करत विना हेल्मेट दुचाकी स्वारांना, विनामास्क रिक्षा चालकांना, बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या नागरिकांना गुलाब पुष्प देत वाहतूक नियमांचे पालन करण्याचं आवाहन केलं.
यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरएसपी कमांडर मणिलाल शिंपी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिता राजपूत यांच्या उपस्थितीत रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यासाठी सुरुवात झाली. एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटनाट्य द्वारे वाहनचालकांना व समाजाला वाहतुकीचे नियम पाळणे किती गरजेचे आहे याची जाणीव करून दिली.
Post a Comment