समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा होणार एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवस महापौर नरेश म्हस्के यांची माहिती
ठाणे , प्रतिनिधी : राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंगळवार, ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस असून दरवर्षीप्रमाणे विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून तो साजरा करण्यात येणार आहे. महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने अँब्युलन्स वाटप, आरोग्य शिबीर, लहान मुलांना क्रिकेट साहित्याचं वाटप अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.श्री. शिंदे यांचा वाढदिवस ठाणे जिल्हा शिवसेना शाखेतर्फे दणक्यात साजरा केला जाणार आहे. गेले वर्षभर करोनाचे सावट आहे. या काळात श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून करोनाबाधितांना दिलासा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले.
घरोघरी धान्यवाटप, औषधांचे वाटप, बेघरांना तयार अन्नाची पाकिटे, रुग्णांसाठी अँब्युलन्स आणि रुग्णालयात उपचारांची सोय, परप्रांतीय मजुरांची परतपाठवणी अशा सर्वच बाबतीत शिवसेना आघाडीवर होती. स्वतः एकनाथ शिंदे दररोज विविध रुग्णालयांना, क्वारंटाइन केंद्रांना भेटी देऊन तेथील व्यवस्था जातीने बघत होते, गैरसोय होत असेल तर दूर करण्याचे काम करत होते. औषधे, सॅनिटायझर, डिसइन्फेक्टंट, रेमडिसिविर, व्हेंटिलेटर, आयसीयू आदी सुविधा कुठेही कमी पडणार नाही, याची सातत्याने काळजी श्री. शिंदे यांनी घेतली.
क्वारंटाइन केंद्रांमध्ये शिंदे यांच्या वतीने अंडी, फळे, रोज वेगवेगळ्या प्रकारचा ताजा नाश्ता आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. अनेक रुग्णालयांमध्ये तर श्री. शिंदे स्वतः पीपीई किट घालून रुग्णांच्या भेटीला गेले आणि तेथील रुग्ण व डॉक्टरांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम केले. श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा रोड, भाईंदर अशा सर्व ठिकाणी विक्रमी वेळेत कोव्हिड रुग्णालये उभारण्यात आली.
या सर्व पार्श्वभूमीवर, श्री. शिंदे यांचा वाढदिवसही सामाजिक बांधिलकीचे भान जपत साजरा करण्याचा निर्णय शिवसेना ठाणे जिल्हा शाखेने घेतला असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा शिवसेनेचा मंत्र आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला सामाजिक कार्याचा वारसा दिलेला आहे. त्याच मार्गावर ठाण्याचे शिवसैनिक आजही वाटचाल करत आहेत.
श्री. शिंदे यांच्या वाढदिवशी दरवर्षीच ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. यंदाही तसे ते होतीलच, परंतु गडकरी रंगायतन येथे दिवसभर सामाजिक उपक्रमांचा हा यज्ञ आयोजित करण्यात आला आहे, असे श्री. म्हस्के म्हणाले. मंगळवार, ९ फेब्रुवारी रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी साडे दहा वाजल्यापासून दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Post a Comment