वंजारी सेवा समितीचे पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर संपन्न
कल्याण , कुणाल म्हात्रे : अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती प्रणित युवा शाखेच्या वतीने वेळोवेळी समाजातील युवा युवती करिता कला, क्रीडा, शैक्षणिक आणि रोजगार या विषयी अनेक उपक्रम राबविले जातात. याचं उपक्रमाचा एक भाग म्हणून २०२१ मध्ये महाराष्ट्र शासना कडून होणाऱ्या मेगा पोलीस भरतीचे अनुषंगाने समाजातील मुलांना पोलीस भरती म्हणजे काय? त्याचे निकष काय असतात ? लेखी परीक्षा कशी असते? मैदानी परीक्षा कशी असते ? शारीरिक क्षमता कशी असावी या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळावी यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वंजारी समाजातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी पोलीस विभागात भरती होऊन देशाची आणि समाजाची सेवा करावी व आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा या उदात्त हेतूने युवा शाखेने रविवारी वंजारी भवन कल्याण येथे पोलीस भरती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. सदर शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक यांनी यावेळी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी माझ्याकडून वैयक्तिक रित्या आर्थिक मदत करण्यात येईल असे जाहीर केले. युवा शाखेचे अध्यक्ष संग्राम घुगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करून धन्यवाद दिले.
पोलीस भरती शिबिरा करिता नॉलेज अकॅडमी कल्याण या संस्थेचे प्रशिक्षक हर्षल जाधव व वाकळेपाटील यांनी सखोल मार्गदर्शन करून शिबिरार्थीच्या शंकांचे निरसन केले. तसेच शिबिरार्थींना तीन महिने पूर्ण कोर्स करिता नॉलेज अकॅडमी तर्फे फी मध्ये ५० टक्के सवलत जाहीर केली. शिबिरात सुमारे १२० विद्यार्थ्यांनी नावे नोंदविली होती. यावेळी कार्यक्रमात अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व शाखाध्यक्ष यांना नियुक्तीपत्राचे वाटप संस्थेचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण दराडे, सुनील आंधळे, सचिन दराडे, माधव दराडे, लता पालवे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment