भाजपा भटके विमुक्त आघाडीची प्रदेश कार्यकारिणी बैठक संपन्न
कल्याण , कुणाल म्हात्रे : भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे संपन्न झाली. प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात केलेल्या संघटनात्मक बांधणी प्रवासाचा आढावा भाजपा संघटनमंत्री विजयराव पुराणिक व महामंत्री तथा भटके विमुक्त आघाडीचे प्रभारी श्रीकांत भारतीय यांच्यासमोर मांडला.
भारतीय जनता पार्टीची समांतर आघाडी म्हणून भटके विमुक्त आघाडीचे काम चालते, समाजातील वंचित व भटक्या विमुक्त जाती जमातींच्या न्याय हक्कासाठी ही आघाडी कार्यरत असते. माजी आमदार नरेंद्र पवार यांची या आघाडीच्या प्रदेश संयोजकपदी निवड झाल्यानंतर प्रथमतः महाराष्ट्रातील तीन विभागात प्रवास करत समाजातील विविध घटकांच्या गाठीभेटी घेतल्या व त्यांच्या अडीअडचणी विस्तृतपणे समजून घेतल्या होत्या, त्याबद्दल प्रदेश कार्यकारिणीत चर्चा केली.
"भटके विमुक्त समाज हा विखुरलेला घटक आहे, पोटापाण्यासाठी मजल दरमजल करत डोंगर दऱ्यातून भटकंती करणाऱ्या समाजाला आता शिक्षण आणि रोजगार यामध्ये स्थिरस्थावर करण्यावर भर दिला पाहिजे, येणाऱ्या काळात या सर्व घटकांना जागृत करत यांची भटकंती थांबविणार असल्याचे मत नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या व दादा ईदाते यांनी भटके विमुक्त आयोगाच्या माध्यमातून केलेल्या शिफारशी लागू केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला. तसेच पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास होत नसून अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले असतानाही राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने त्याबाबत निषेध व्यक्त केला. संघटनमंत्री विजयराव पुराणिक व महामंत्री श्रीकांत भारतीय यांनी संघटन वाढीच्या दृष्टीने आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पद्मश्री खासदार विकास महात्मे, भाजपा भटके विमुक्त आघाडी महिला संयोजिका डॉ.उज्वला हाके, युवा संयोजक अमोल गायकवाड, युवती संयोजिका ऍड.भाग्यश्री ढाकणे, सहसंयोजक संतोष आव्हाड आदी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment