भिवंडी :दि.२८ (प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील शेती म्हणजे फक्त पावसाळी भातशेती चे पीक त्यात ही सध्या तालुक्यात आलेले गोदाम रिअल इस्टेट च्या शेतीमुळे भातशेती नष्ट होत असताना जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती कुंदन पाटील यांनी आपल्या पडघा जवळील वालकस
गावातील शेतात चक्क महाबळेश्वर येथे पिकविली जाणारी स्ट्रॉबेरी ची लागवड करून त्या मधुर फळांची गोडी चाखत आहेत .
दापोडे येथील मूळचे शेतकरी असलेले कुंदन पाटील यांचे वडील कै तुळशीराम पाटील यांनी परीसरात गोदामांची शेती उभी राहिल्याने त्यांनी पडघा नजीकच्या वालकस या गावात सात एकर शेत जमीन खरेदी करून तेथे शेती ची आपली परंपरा सुरू ठेवली होती.
या शेत जमिनीत कुंदन पाटील यांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपल्या शेतात सफेदकांदा,कलिंगड,टरबूज, भेंडी,वांगी,फ्लॉवर,टोमॅटो,शिमला मिर्ची, बटाटा,झेंडू यांची लागवड करीत त्याचे पीक जोमाने घेत आपल्या दैनंदिन गरजेच्या भाजीपाल्याची गरज भागवत असतानाच महाबळेश्वर येथील एका मित्राच्या सल्ल्याने त्यांनी आपल्या शेतातील दोन गुंठे जमिनत तब्बल एक हजार स्ट्रॉबेरीची रोपे मागवून त्याची लागवड डिसेंबर च्या सुरवातीला केली .मशागत करीत योग्य ती काळजी घेतल्याने या स्ट्रॉबेरीच्या रोपट्यांना फळे येण्यास सुरुवात झाली व पाहता पाहता लाल पिकलेली फळे या शेतात बहरली.
शेतकरी कुटुंबातील असल्याने शेती स्वस्थ बसू देत नव्हती त्यामुळे या शेतजमिनीत विविध प्रयोग करीत विविध भाजीपाला लागवडीचा प्रयत्न आपण केला असून या शेतजमिनीत दररोज सकाळी सात ते नऊ वाजता दरम्यान येऊन मी स्वतः मशागत करीत असल्याने आपणास वेगळा आनंद मिळत असल्याची भावना कुंदन पाटील यांनी बोलून दाखविली आहे .
शेती सध्या नुकसानीचा व्यवसाय ठरत असतानाच भिवंडी तालुक्यातील शेतात बरेच काही पिकू शकते व त्यातून चांगले अर्थाजन ही होऊ शकत असल्याचे कुंदन पाटील यांनी या अभिनव प्रयत्नातून दाखवून दिले आहे .त्यांच्या या प्रयत्नांची महिती समजल्यावर त्यांच्या शेतास अनेकांनी भेटी दिल्या त्यामध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे,हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांचा समावेश आहे.
Post a Comment