भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील भेंडी लागवड क्षेत्र जास्त असलेल्या भागात भेंडी दिनाचा कार्यक्रम घेणे बाबत शासनाच्या सूचना असल्याने पोई गावात पदमाकर हरड यांच्या प्रक्षेत्रावर या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी पोई गावच्या सरपंच दिपाली बुटेरे हया होत्या. प्रशिक्षणामध्ये विकेल ते पिकेल अभियान संत शिरोमणी आठवडी बाजार भेंडी लागवड तंत्रज्ञान व कृषि विभाग योजना इ.विषयी सखोल मार्गदर्शन तालुका कृषि अधिकारी शिल्पा निखाडे यांनी केले.
सेंद्रिय निविष्ठा तयार करणे सेंद्रिय खतांचा वापर व रासायनिक खतांचे दुष्परिणाम आदी विषयी भगवान पथारे यांनी मार्गदर्शन केले. एकात्मिक पिक व्यवस्थापन तसेच भेंडी पिकावरील कीड व रोग नियंत्रण, खत व पाणी व्यवस्थापन आदी विषयी वैशाली भापसे यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती बुचडे व श्रद्धा सौदंणकर यांनी विशेष प्रयत्न केले.

Post a Comment