विना अनुदानित शिक्षकांच्या पाठीशी उभे रहा शिक्षक आमदार नागो गाणार
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण येथील शिक्षक भवनात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेची शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शंका समाधान सभा संपन्न झाली. सभेला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व नागपूर विभाग शिक्षक आमदार नागो गाणार, राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू उपस्थित होते.
नागो गाणार यांनी सातव्या वेतन आयोगातील त्रुटी, शिक्षक शिक्षकेतर भरती, विनाअनुदानित शाळांना अनुदान, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, शिक्षक मुख्याध्यापक वैयक्तिक मान्यता, संचालक उपसंचालक, शासन स्तरावरील प्रलंबित असलेले शिक्षकांची प्रकरणे अशा विविध विषयांवर शिक्षकांशी संवाद साधला. तसेच आझाद मैदानावर सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलना बरोबर आपण असून त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. त्यांना न्याय मिळण्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आंदोलनात्मक संघर्ष उभा करायचा आहे.
यापूर्वी परिषदेने अनेक आंदोलने केली त्यातून काही शाळा २० टक्के तर वाढीव टप्पा ४० टक्के अनुदानास पात्र ठरवून यादी घोषित केली. या शिक्षकांचे पगार लवकर सुरू व्हावेत. अजूनही हजारो शिक्षक अनुदानापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करावे लागेल असेही सांगितले.
कल्याण डोंबिवली महानगर चे कार्यवाह गुलाबराव पाटील, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष हेमलता मुनोत, सहकार्यवाह आप्पाराव कदम, राज्य सहकार्यवाह शांताराम घुले, कोषाध्यक्ष प्रवीण बडे आदी पदाधिकारी संदीप वाकचौरे, संदीप बडे, संजय लांडगे, सोमनाथ ढवळे व इतर शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक गुलाबराव पाटील यांनी केले तर आभार हेमलता मुनोत यांनी मानले.

Post a Comment